- दुर्गेश मोरे
पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण घडामोडी घडू लागल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे थेट मैदानात उतरले आहे. नुकत्याच झालेल्या महारोजगार मेळाव्यात पवारांनी बारामतीकरांचा कल जाणून घेतला. त्यानंतर थेट पुरंदर आणि काल-परवा भोरला माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अजित पवारांमुळे जे दुखावले आहेत त्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवारांनी सुरू केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. आता दौंड, इंदापूर लक्ष्य केली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीकर कोणाला साथ देणार यावर चर्चा रंगल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावनिक साद देखील बारामतीकरांना घातली होती. त्यानंतर बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवारांच्या गुगलीने नाट्यमय घडामोडी घडल्या. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शरद पवारांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत आले. कार्यक्रम महायुतीचा होता पण त्यामध्ये शरद पवारांनीच भाव खाल्ला होता. आगमनापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत बारामतीकरांनी केवळ शरद पवारांनाच इतरांच्या तुलनेत अधिक प्रमाणात दाद दिली. बारामतीत केवळ अजित पवारच अशी जी चर्चा सुरू झाली होती. त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या चर्चेला पूर्णविराम दिला.
दौंडला भाजपचे आमदार राहुल कुल असले तरी पवार कुटुंबीयांबरोबर ते नातेवाईक आहेत. त्यामुळे कुल कुटुंबीयांचा कौल कोणाकडे असणार हे लवकरच स्पष्ट होईल. इंदापूरमध्येही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अजित पवारांच्या विरोधात आहेत. त्यांची भूमिकाही अस्पष्ट आहेच. साखर महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. बारामती, पुरंदर आणि भोर विधानसभा भक्कम केल्यानंतर आता दौंड, इंदापूर हेच शरद पवारांचे पुढचे लक्ष्य असणार आहेत.
दुखावलेल्यांना केले जवळ
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जागावाटपामुळे व्यस्त झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघ नाही तर अन्यत्र देखील त्यांना लक्ष देणे सध्या तरी कठीण होत असल्याचे चित्र आहे. त्याचाच फायदा उचलत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मैदानात उडी मारत बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. अजित पवारांमुळे जे दुखावले गेले आहेत त्यांना जवळ करण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे. शरद पवारांचे जुने सहकारी सतीश खोमणे, सुभाष ढोले याशिवाय एस. एन. जगताप ही जुनी मंडळी एकवटली आहेच, पण याला पवारांशी ऋणानुबंध असलेल्या व्यक्तींची देखील साथ मिळाली आहे. आतापर्यंत शरद पवारांची अनेकांनी भेट घेतली असून, त्यामध्ये अजित पवारांकडून दुखावलेल्यांचा भरणा अधिक प्रमाणात असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.
लोकसभेला सुळे तर विधानसभेला अजितदादाच...
शरद पवार की अजित पवार यावर बारामतीकरांनी अजूनही स्पष्टपणे भूमिका घेतली नाही. आतापर्यंत विकासकामांवरून अजित पवारांचे पारडे जड वाटत होते. मात्र, शरद पवारांनी दौरे सुरू केल्यामुळे विस्कटलेली घडी पुन्हा बसू लागली आहे. इतकेच नाही तर आतापर्यंत लोकसभेला खासदार सुळे यांना पाठबळ देत आलो आहे. आताही तसेच होईल. लोकसभेला सुळे तर विधानसभेला अजितदादाच राहणार असल्याची चर्चाही आता बारामतीत सुरू झाली आहे.
पुरंदरमध्ये कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप शरद पवारांकडे आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सहभागी झालेच, पण तत्पूर्वी त्यांचे अत्यंत निकटवर्तीय देखील भाजपमध्ये सामील झाले. या सर्व प्रकारामुळे स्थानिक भाजप नेत्यांसह कार्यकर्तेही दुखावले गेले. त्यातच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अपक्ष उभे राहण्याची घोषणा केली आहे. या राजकीय परिस्थितीमुळे गोंधळात भर पडली आहे.
संग्राम थोपटेंचे स्वीकारले पालकत्व
काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, एका रात्रीत यादीतून नाव गायब झाले. तसेच विधानसभा अध्यक्षपदावेळीही आमदार थोपटेंना डावलण्यात आले. राष्ट्रवादीमुळे हे सर्व घडल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद यांचे सख्य सर्वांना माहीतच होते. अशा परिस्थितीत शरद पवारांनी शनिवारी निवासस्थानी जाऊन अनंतराव थोपटे यांची विचारपूस केली. यावेळी आता वय काय, असा प्रश्न शरद पवारांनी करताच अनंतराव थोपटे यांनी ९५ असल्याचे सांगत अजूनही शेतात जातो असे सांगितले. कौटुंबिक गप्पा झाल्यानंतर नसरापूरच्या सभेत थेट संग्राम थोपटे यांचे जाहीरपणे पालकत्व स्वीकारल्याने भाेरचाही प्रश्न मार्गी लावला.