बारामती (पुणे) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पनवेल येथे १८ मार्च रोजी राज्यव्यापी अधिवेशन होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असून शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्यांवर या अधिवेशनात सरकारकडून घोषणा होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली चालणारी राज्यातील प्राथमिक शिक्षकांची सर्वात मोठी संघटना आहे, मागील चाळीस वर्षांमध्ये एकमेव या संघटनेच्या अधिवेशनास शरद पवार यांची आवर्जून उपस्थिती असते, राज्यस्तरावरील शिक्षकांचे अनेक प्रश्न अधिवेशनाच्या निमित्ताने व्यासपीठावर सोडवण्याची शिक्षक संघाची परंपरा असल्याने ही अधिवेशने लाखोंच्या संख्येने पार पडली आहेत.
रत्नागिरी ओरोस, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे, शिर्डी येथील अधिवेशनामध्ये शरद पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवून शिक्षक हिताच्या अनेक घोषणा करण्यात संघटनेस यश मिळाले आहे. पनवेल येथील अधिवेशनास शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, रोहित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
शिक्षकांचे रखडलेले प्रश्नशिक्षकांचे जुनी पेन्शन, वेतन त्रुटी, जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया, रखडलेली पदोन्नती,१०-२०-३० आश्वासित योजना, संगणक परीक्षा वसुली, कॅशलेस विमा, वस्तीशाळा व अप्रशिक्षित शिक्षक सेवाजेष्ठता यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने शरद पवार यांनी मध्यस्थी करावी ,अशी शिक्षकांची मागणी आहे, शरद पवार यांची शिक्षक संघाच्या व्यासपीठावर आवर्जून उपस्थिती असते. त्यामुळे शिक्षक संघाच्या अधिवेशनातील निर्णयाकडे राज्यातील शिक्षक नेहमीच डोळे लावून बसलेले असतात.
अधिवेशनासाठी शिक्षकांना सुट्टीराज्य शासनाने पनवेल येथील शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी १५,१६ व १७ मार्च रोजी तीन दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे. राज्यातून एक लाखाहून अधिक शिक्षक अधिवेशनासाठी उपस्थित राहतील, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.