शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 07:27 PM2023-07-18T19:27:32+5:302023-07-18T19:28:16+5:30
शरद पवारांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती
बारामती : आदरणीय पवार साहेबांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी ते केवळ ३७ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री अशी झाली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा झंझावात तेंव्हा जसा होता तसाच किंवा त्याहीपेक्षा जास्त आता देखील आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
१८ जुलै १९७८ रोजी पवार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याला ४५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यावेळी पवार यांचा असणारा कार्यकर्तृत्वाचा झंझावात आज देखील तसाच, किंवा त्यापेक्षा जास्त असल्याची सुळे यांची सोशल मिडीयावरील पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टद्वारे सुळे यांनी ज्येष्ठ नेते पवार यांचा आजहि या वयात तोच झंझावात असल्याचा इशारा विरोधकांसह पक्षातून बाहेर गेलेल्या गटाला दिला आहे.
आदरणीय पवार साहेबांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी ते केवळ ३७ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री अशी झाली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा झंझावात तेंव्हा… pic.twitter.com/rlrhnVRD3E
— Supriya Sule (@supriya_sule) July 18, 2023
सध्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाच्या पार्श्वभुमीवर सुळे यांनी केलेली पोस्ट बरेच काही सांगुन जाते. पवार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या त्या क्षणाला आज ४५ वर्ष झाली आहेत. या पार्श्वभुमीवर आज पक्षांतर्गत चित्र बदलले असले तरी पवार यांचा झंझावात कायम असल्याचे सुळे यांनी सुचित करीत जणु संबंधितांना इशाराच दिला आहे.