शरद पवार शेवटपर्यंत विरोधात होते, माझा पराभव कसा झाला सर्वांनाच माहिती - अनंतराव थोपटे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:28 PM2024-03-20T13:28:16+5:302024-03-20T13:29:05+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज भोर येथे जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर बोलत असताना अनंतराव थोपटे बोलत होते....
- किरण शिंदे
पुणे : शरद पवार शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. त्यावेळी दिल्ली माझ्यासोबत होती तरी देखील माझा पराभव झाला. तेव्हा माझा पराभव कसा झाला हे सर्वांनाच माहीत आहे. तरीदेखील मी शेवटपर्यंत काँग्रेस सोडली नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार मला भेटून गेले. मी काही त्यांना बोलावलं नव्हते. त्यावेळी जुन्या आठवणी जागा झाल्या असे सांगत अनंतराव थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज भोर येथे जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर बोलत असताना अनंतराव थोपटे बोलत होते.
पुढे बोलत असताना अनंतराव थोपटे म्हणाले, बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता शरद पवारांची मुलगी आणि अजित पवारांची पत्नी निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात शिवतारे उभे आहेत. त्यामुळे कुणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल अद्याप विचार केला नाही. विचार करून याबद्दल निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भोर मध्ये जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. भोर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर तब्बल 25 वर्षानंतर पवारांनी थोपटे यांची भेट घेतली. अनंतराव थोपटे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असताना शरद पवारांनी त्यांचा पराभव केला असे बोलले जाते. त्यावेळी शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून अनंतराव थोपटे यांच्या विरोधात काशिनाथ खुटवड यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत अनंतराव थोपटे यांचा पराभव झाला होता.