पुणे: भाऊसाहेब शिरोळे म्हणजे पुण्याच्या राजकारणातील एकेकाळचे फार मोठे प्रस्थ होते. जंगली महाराज रस्त्यावर एक पेट्रोलपंप होता. तिथे त्यांचे कार्यालय होते. या कार्यालयात ते बसलेले असायचे. तिथेच पुण्यातील काँग्रेसचे सगळे दिग्गज जमायचे. आत चर्चा व्हायची. तिथे ठरायचे मग, पुण्याचा महापौर कोण करायचा? कोणाला पाडायचे? पुण्यातील कोणते रस्ते करायचे? तिथून मग ते निर्णय महापालिकेत जायचे, त्यानंतर त्यावर प्रशासकीय मोहोर उमटायची व कामाला सुरूवात व्हायची.
आज कोणाचा विश्वास बसणार नाही, पण त्यावेळी महाविद्यालयात असलेले व काँग्रेसचे काम करणारे शरद पवार हेही या पेट्रोल पंपावरील कार्यालयात युवा कार्यकर्ते म्हणून सतत जात असत. त्यामुळेच सन १९६७ च्या निवडणूकीत राज्यातील सर्वात तरूण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, व त्यातही मंत्री झाल्यानंतर शरद पवार पुण्यात आल्यावर प्रथम गेले ते भाऊसाहेबांच्या घरी. पुण्याच्या राजकारणाचे सर्वेसर्वा असलेले भाऊसाहेब त्यावेळी विधानपरिषदेचे आमदार होते.
भाऊसाहेब उमद्या मनाचे नेते होते. तरूण शरद पवार त्यांच्या पाया पडले, त्यावेळी त्यांनी त्यांना आशीर्वाद तर दिलाच, पण त्याकाळात सर्वाधिक मानाचा समजला जाणारा फेटाही स्वत:च्या हातांनी त्यांना बांधला. तेच हे छायाचित्र. भाऊसाहेबांचे चिरंजीव श्रीकांत शिरोळे यांनी सांगितले शरद पवार यांनी मंत्री झाल्यावर आपली आठवण ठेवली याचा भाऊसाहेबांना फार आनंद झाला होता.. तो त्यांनी पवारांना बोलूनही दाखवला.