Sharad Pawar : भाजपाला पुणे जिल्ह्यात शरद पवार यांनी मोठा धक्का दिला आहे. खेड तालुक्यातील भाजपा नेते अतुल देशमुख यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. आज हा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार शरद पवार यांनी अकलूज येथील धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्ष प्रवेशावरही पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
शरद पवार म्हणाले, विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांचे काम करण्यासाठी सहभागी होत आहेत. पक्षात प्रवेश करण्याचा अतुल देशमुख यांनी आज निर्णय घेतला. लोकांचे काम करण्याची भूमिका त्यांनी खेड तालुक्यात बजावली आहे. पण लोकांच्या समस्या आणि भाजपच्या धोरणात फरक आहे. त्यामुळेच त्यांनी निर्णय घेतला. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो, असंही शरद पवार म्हणाले. यावेळी बोलताना पवार यांनी पहिल्यांदाच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, येत्या १६ तारखेला धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षात प्रवेश करतील. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील, असंही पवार म्हणाले.
शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
गुढी पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला, यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली." गेल्या १० ते १५ वर्षात राज ठाकरेंचे ३, ४ निर्णय मी बघितले आहेत,असा टोलाही पवार यांनी ठाकरेंना लगावला. कधी भाजपाबाबत एकदम तिखट प्रतिक्रिया दिली आणि बाजूला झाले. कधी पाठिंबा दिला. त्यांना नक्की काय करायचं होतं हे मला सांगता येणार नाही. त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता पाठिंबा दिला आहे. बघू दोन तीन दिवसात काय ते स्पष्ट होईल. त्यांनी असा निर्णय का घेतला हे राज ठाकरेच स्पष्ट करु शकतील, असंही शरद पवार म्हणाले.