पुणे/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच चर्चेत असतात. कधी आपल्या उप्रकमांनी, कधी कामामुळे तर कधी बड्या नेत्यांवर केलेल्या टिकेमुळे ते माध्यमांत चर्चेत असतात. आता, रोहित पवारांनामंत्रीपदाची संधी कधी मिळणार याची चर्चा रंगली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एका कार्यकर्त्याने रोहित पवार नामदार कधी होतील? असा प्रश्न विचारला होता.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे, आदिती तटकरे या युवक आणि आमदारकीची पहिलीच टर्म पार पाडत असलेल्या नेत्यांना थेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मात्र, रोहित पवारांना ही संधी मिळण्यासाठी वाट पाहावी लागली. अर्थातच, पवार कुटुंबातील सदस्य असल्याने त्यांच्या नावाला अनेक टिकाकारांनी लक्ष्य केले होते. मात्र, आमदार म्हणून रोहित पवार त्यांचं काम करत आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात थेट शरद पवारांनाच एका कार्यकर्त्याने रोहित पवार नामदार कधी होतील, असा प्रश्न केला. त्यावर, पवारांनीही स्पष्टपणे मिश्कील उत्तर दिले.
पुण्यात पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली यावेळी शरद पवारांनी चौफेर फटकेबाजी केली. याच कार्यक्रमात कार्यकर्त्याच्या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले. 'मी 1967 साली विधानसभेत गेलो होतो. नामदार होण्यासाठी मी आमदार झाल्यानंतर 5 वर्ष थांबलो होते,' असे उत्तर शरद पवार यांनी दिले. पवारांच्या या उत्तरामुळे रोहित पवार समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीशी निराशा झाली. मात्र, पुढच्या टर्मला तरी रोहित पवार यांना नामदारकीची संधी मिळेल, अशी चर्चा मात्र यानिमित्ताने रंगली आहे.