Junnar Assembly Constituency ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून खासदार शरद पवारही अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. दोन दिवसापूर्वी इंदापूरमधील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता जुन्नर विधानसभेची चर्चा सुरू आहेत. अजित पवार गटातील आमदार अतुल बेनकेंविरोधात खासदार शरद पवार निष्ठावंत शिलेदार मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट झाली. यानंतर जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळाले. आता काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं दिसत आहे.
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
विधानसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकमेकांविरोधात लढणार असल्याचे चित्र दिसत आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात खासदार शरद पवार तगडा उमेदवार देणार असल्याचे दिसत आहे. जुन्नरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ज्या नावांची चर्चा आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे जुन्नर विधानसभा समन्वयक मोहित ढमाले यांचाही समावेश आहे.
जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देणे पसंत केले. त्यामुळे या मतदारसंघात आता शरद पवार यांच्याकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. अशातच पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोहित ढमाले यांच्या नावाचा शरद पवार यांच्याकडून विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत असलेल्या मोहित ढमाले यांनी २०१७ ते २०२२ या काळात जिल्हा परिषद सदस्यपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे.
मोहित ढमाले यांनी उमेदवारीची केली मागणी
दरम्यान, मोहित ढमाले यांनी पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांना शरद पवार उमेदवारी देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.