बारामती (पुणे) : सातत्याने घसरत चाललेल्या दुधाच्या दराबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार असून पुढील दहा-पंधरा दिवसांमध्ये याविषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी बारामती येथे बोलताना सांगितले.
बारामती (माळेगाव) येथील गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरूवारी (दि. ८) माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा धंदा महत्त्वाचा आहे. जिरायत शेती असलेल्या भागामध्ये दुधाचा धंदा हा तेथील शेतकरी कुटूंबाचा संसार चालवतो.
सध्या दुधाची किंमत इतकी घसरली आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अजिबात योग्य नाही. म्हणून मी स्वत: पुढच्या दहा-पंधरा दिवसांमध्ये या विषयाबाबत विचार विनिमय करणार आहे. राज्य सरकारला यासाठी विनंती करणार आहे की यामधून काहीतरी मार्ग काढा. याकामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असं पवार म्हणाले.