लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 02:03 PM2024-06-18T14:03:01+5:302024-06-18T14:05:45+5:30
शरद पवार यांनी बारामतीच्या ग्रामीण भागात दुष्काळ पाहणी आणि जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केलं आहे.
Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान मोडून काढत सुळे यांनी तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय मिळवला. बारामतीत उमेदवार कोणीही असले तरी मुख्य सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होता. प्रतिष्ठेच्या या सामन्यात शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांना आस्मान दाखवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांना चितपट करण्यासाठी शरद पवारांकडून प्रयत्न सुरू झाल्याचं दिसत आहे. लोकसभेच्या विजयोत्सव साजरा करणं टाळून शरद पवार यांनी बारामतीच्या ग्रामीण भागात दुष्काळ पाहणी आणि जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केलं आहे.
शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यात त्यांचे नातू युगेंद्र पवार हे सावलीसारखे सोबत असल्याचंही दिसत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडून बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवार यांचे लाँन्चिंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आता बारामतीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकीकडे पक्षाबाहेर गेलेल्या लोकांना परत घेण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगत शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या परतीचे दोर कापलेले असताना आता नातू युगेंद्र पवार यांच्यासह बारामतीच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जनसंवाद दौऱ्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
बारामतीतील जनसंवाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
काही दिवसांपूर्वी बारामतीतील सुपे, शिर्सुफळ या भागाचा दौरा केल्यानंतर आता शरद पवार यांच्या जनसंवाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यादरम्यान ते तालुक्यातील उर्वरित भागातील गावांमध्ये जात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यापासून शरद पवार हे बारामतीत फारसे फिरत नसत. मात्र आता अजित पवारांनी वेगळी राजकीय वाट धरल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात उतरल्याने आगामी विधानसभा निवडणूक रंजक ठरणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी नातू युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवल्यास अजित पवार यांच्यासाठी ही लढाई आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात.