Sharad Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार असे दोन तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. या मतदारसंघात जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही गटांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून एकमेकांचे समर्थक आपल्या गळाला लावण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. सुप्रिया सुळे यांचे इंदापूरमधील प्रचारप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने यांनी नुकताच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला. सुळे यांच्यासाठी हा धक्का मानला जात होता. या धक्क्याची भरपाई राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेजारच्या दौंड तालुक्यात केल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी आज सकाळी पवार यांची पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
नामदेव ताकवणे हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. मात्र दौंड तालुक्यात भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या राहुल कुल यांच्या हाती सूत्रे सोपवल्यापासून नामदेव ताकवणे यांचे पक्षातील महत्त्व कमी झाले होते. त्यातच मागील वर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपमध्ये असलेल्या नामदेव ताकवणे यांनी संजय राऊतांचे समर्थन केले होते. आता आपण कारखाना वाचवण्याच्या मुद्द्यावरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचं ताकवणे यांनी सांगितलं आहे.
"मागील दोन पिढ्यांपासून आम्ही भाजपचे काम करत आहोत. मात्र सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचा साखर कारखाना वाचवण्यासंदर्भात मी वेळोवेळी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊनही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. शरद पवार यांनी आम्हाला साखर कारखाना आणि दौंड तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात आश्वासन दिल्याने आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहोत," अशा शब्दांत नामदेव ताकवणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रवीण मानेंनी केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रविण माने यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाला पाठिंबा देऊन महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्या घरी चहापान करत टाकलेला डाव यशस्वी ठरला. हा सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारयंत्रणेत सहभागी होत प्रचाराची धुरा हाती घेतली होती. सुळे यांची सर्व भिस्त माने यांच्यावर होती. मात्र शरद पवार यांच्या इंदापूर येथील जाहीर सभेला ते अनुपस्थित राहिल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने व कुटुंबीयांची यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.