कर्वेनगर : राज्यातील शिक्षकांच्या बदल्या आणि पेन्शनचा प्रश्न मुख्यंमंत्र्याबरोबर शिक्षक संघाची बैठक घेऊन सोडविला जाईल, असे आश्वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या पुणे येथील शिक्षण परिषदेत बोलताना दिल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचा रौप्य महोत्सव व शिक्षण परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. शरद पवार यांच्या हस्ते शिक्षण परिषदेचे उद्घाटन झाले. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील अध्यक्षस्थानी होते.खासदार वंदना चव्हाण, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्षजालिंदर कामठे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, रोहित पवार, दिगंबर दुर्गाडे, दीपक मानकर, चेतन तुपे, अतुल बेनके, रणजित शिवतरे, संभाजीराव थोरात, शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्यासह जिल्हाभरातील पाच हजारांहून अधिक शिक्षक उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘मागील चाळीस वर्षांमध्ये राज्यभरातील प्राथमिक शिक्षण दर्जेदार होण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न वेळोवेळी सोडविले आहेत. पुणे जिल्हा संघाच्या शैक्षणिक संकुलामधील नव्याने केलेले बदलामुळे संस्थेचा नावलौकिक भविष्यात आणखी वाढेल.’’दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. एकीकडे शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करायची व दुसरीकडे शाळा बंद करायच्या हा विरोधाभास आहे, असे सांगून जिल्हा शिक्षक संघाने संकुलाचे ‘पद्मभूषण शरचंद्रजी पवार शैक्षणिक संकुल’ असे नामकरण केल्याबद्दल समाधान व्यक्त करून वळसे-पाटील यांनी जिल्हा बँकेतून शिक्षकांना ५ लाख रुपये कॅश क्रेडिट देण्याची घोषणा केली.खासदार वंदना चव्हाण, विवेक वळसे-पाटील, रोहित पवार, दीपक मानकर, संभाजीराव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षण परिषदेतील घोषणाशिक्षकांना जिल्हा बॅँकेतून ५ लाखांचे कॅश क्रेडिट मिळणार. १ मार्चपासून सकाळच्या शाळा भरविण्याचा निर्णय शिक्षण समितीत घेईल. दरमहा १ तारखेला पगार होणार. वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावांना १५ दिवसांत मंजुरी. एकस्तर वेतनश्रेणीतील अडचणी सोडविणार. विजबिलांसाठी निधीची तरतूद करणार.राज्यभरातील शिक्षकांच्या बदल्या व पेन्शन या विषयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षक संघाची बैठक आयोजित करून मार्ग काढला जाईल. मागील ५० वर्षांत राजकारण करताना समाजाचे हित जोपासले; त्यामुळे सत्ता असो वा नसो आमचा शब्द कोणी टाळत नाही, ही तुम्हा सर्वांची पुण्याई आहे.
शिक्षकांसाठी मध्यस्थी करणार, शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेत शरद पवारांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 6:32 AM