Sharad Pawar Pune : पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगची दहशत वाढल्याचे चित्र आहे. कोयत्याने हल्ले केल्याच्या अनेक घटना शहरात सतत घडत असतात. त्याचबरोबर ड्रग्ज प्रकरणानेही खळबळ माजली होती. या दोन्ही मुद्द्यांवरून शरद पवारांनीमहायुती सरकारला घेरले. खराडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनीमहायुती सरकारचा उपरोधिक शब्दात समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले, "आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी पुण्यामध्ये काय केलं? मी देशाच्या कामासाठी दिल्लीला जातो, पार्लमेंटचा सभासद आहे म्हणून दिल्लीला जातो. महाराष्ट्राची वर्तमानपत्र मागून घेतो. टीव्ही लावतो, काय बघायला मिळतं? पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचे वैशिष्ट्य काय? कोयता गँग. कोयता गँग विद्येचे माहेरघर हे पुणे."
राजकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य कोयता गँग केले -शरद पवार
"टेल्को सारखा कारखाना, या पुण्यात बजाज सारखा कारखाना हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे. किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचे वैशिष्ट्य आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य काय केले? कोयता गँग", असे म्हणत शरद पवारांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून महायुती सरकारला लक्ष्य केले.
"आता भाषणामध्ये कोणी सांगितलं. अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय करते मला माहित नाही. कसल्या तरी गोळ्या असतात, ते खाल्लं तर एकदम चंद्रावर जातो आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागांमध्ये व्हायला लागला आहे", असे म्हणत शरद पवारांनी अमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाधितेवरून सरकारवर निशाणा साधला.
"कोयता गँग, ड्रग्ज व्यवहाराचा राजकर्त्यांकडून विस्तार"
"आजचे राज्यकर्ते कोयता गँग असो, ड्रग्ज व्यवहार असो याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत. यामुळे पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार, या प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसते. आज हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राचा चेहरा आम्हाला बदलायचा आहे. आता शिंदे साहेबांचं राज्य आहे. त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांच राज्य होतं. काय केलं यांच्या राजवटीत? मी स्वतः तुम्हा लोकांच्या पाठिंब्याने चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. आमचे अनेक सहकारी मंत्रिमंडळात होते. सत्तेचा वापर राज्याचा चेहरा बदलण्यासाठी करायचा असतो हे आम्ही दाखवलं", असे शरद पवार म्हणाले.