पुणे: शिरूर तालुक्याच्या माजी आमदार व शरद पवार यांचे अत्यंत जवळ सहकारी असणारे पोपटराव गावडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
रविवारी सकाळपासून पोपटराव गावडे हे कार्यक्रमात व्यस्त होते. त्यांनी निमगाव दुडे येथे भुमिपुजन कार्यक्रम उरकुन घरी आले .मात्र दुपारच्या वेळी त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तब्येत बघून शिरूर येथील डॉक्टरांनी त्यांना पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर याबाबत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालय प्रशासनाला पोपटराव गावडे यांच्या प्रकृतीबाबत कल्पना देत तातडीने उपचार सुरु करण्यांची विनंती केली. त्यांना शिरूर वरून रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. हिरेमठ हे त्यांच्यावर उपचार करीत असून त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कुठेल्ही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पोपटराव गावडे हे शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जातात. सन १९९५ ते २००४ मधे त्यांनी शिरूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले. तसेच १९६७ ते १९९५ पर्यन्त विक्रमी नेतृत्व त्यांनी पुणे जिल्हा परीषदेचे सदस्य म्हणुन काम केले. तसेच ११ वर्ष शिरूर पंचायत समिती सभापती, नऊ वर्ष उपसभापती, जिल्हा दुध संघ अध्यक्ष अशी प्रदीर्घ काळ राजकारण केले. पक्षाशी एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख आहे.
छातीत अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बाबत माहीती समजताच रुबी हॉल मधे त्यांना भेटण्यासाठी कार्यकत्यांनी मोठी गर्दी केली . त्यांची तब्बेत स्थिर असुन कार्यकर्त्यानी काळजी करू नये, अतिदक्षता विभागात असल्याने भेटण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केली आहे.