Sararthi वर थेट शरद पवारांचे लक्ष; संस्थेची जबाबदारी अजित पवारांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 08:06 PM2021-10-01T20:06:12+5:302021-10-01T21:48:42+5:30
सारथीच्या सध्याची कामे व भविष्यातील नियोजनाचा घेतला आढावा
पुणे : गेल्या काही महिन्यांत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सारथीची धुरा आल्यानंतर अनेक चांगले बदल व सुधारणा झाल्या आहेत. सारथीच्या इमारतीचा विषय असो की निधी, योजना मार्गी लागल्या आहेत. ऐवढेच नाही तर सारथी संस्थेमुळे नुकत्याच झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत मराठा समाजाचा टक्का वाढला असून, संस्थेचे 21 विद्यार्थी यशस्वी झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सारथीचा कारभार उत्तम सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच थेट सारथीत लक्ष घातले आहे. पवार यांनी शुक्रवारी सारथी संस्थेची सध्याची कामे व भविष्यातील नियोजनाचा आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील सारथीची बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सारथीचे अधयक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्यासह अनेक महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
मराठी व मराठी कुणबी समाजातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी स्थापन झालेली सारथी संस्था स्थापनेपासूनच चर्चेत आहे. महाआघाडीमध्ये सारथीची जबाबदारी सुरूवातील काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली होती.
सारथी अधिक गतीने काम करेल अशी अपेक्षा
पुण्यात सारथी संस्थेचे आंदोलन पेटल्यानंतर वडेट्टीवार यांच्याकडे असलेली सारथीची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर काही तासात पवार यांनी सारथीचा निधीचा प्रश्न मार्गी लावला होता. तर गेल्या एक वर्षभरात सारथीला मुख्य कार्यालयाची इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून इमारत बांधकामासाठी निधी, नियमित कामकाजासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सारथीच्या नवीन इमारतीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच सध्या सुरू असलेले उपक्रम आणि भविष्यातील विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आता शरद पवार यांनीच थेट लक्ष घातल्याने सारथी अधिक गतीने काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.