पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत, असं भाकीत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या गौरव सोहळादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पुण्यात शनिवारी हा कार्यक्रम पार पडला. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांनी मात्र हात हलवत नाही अशी खूण केली. सभागृहात उपस्थित प्रेक्षकांचं मात्र यामुळे चांगलंच मनोरंजन झालं. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरसुद्धा उपस्थित होते.
एका माजी राष्ट्रपतीचा सन्मान भावी राष्ट्रपतीकडून होतोय असं शरद पवारांकडे बघत सुशीलकुमार शिंदे म्हणाले. मात्र यानंतर शरद पवारांनी हात हालवत नाही अशी खुण केली. हजरजबाबी सुशिलकुमार शिंदे यांनी लगेच पवारांची चुटकी घेत, जेव्हा ते नाही म्हणतात तेव्हा ते होय असं समजायचं असतं हे मला त्यांच्यासोबत इतकी वर्ष राहिल्यानंतर समजलं आहे असं म्हणाले. सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यानंतर सभागृहातील प्रेक्षक मात्र खळखळून हसू लागले.
पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, 'शरद पवारांमुळे मला कात्रजचा घाट कसा पार करायचा हे समजलं, तर प्रतिभा पाटलांमुळे गरिब जनतेसाठी कसं काम करावं हे कळलं. राजकारणात या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत'.