बारामती: राज्यात अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय व विषमुक्त उत्पादनांसाठी सुरूवात केली आहे. मात्र,या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी कृषी, सहकार व पणन विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. सेंद्रिय व विषमुक्त शेतीच्या विकासात या तीनही विभागाची मदत घेऊन सेंद्रिय शेतीचे नवीन धोरण तयार करण्याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
महा ऑरगॅनिक अॅन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन (मोर्फा) च्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पवार यांची त्यांच्या येथील ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली. सेंद्रिय व विषमुक्त तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण शेती अनेक शेतकरी राज्यात करत आहेत, परंतु त्यांना त्याचे मार्केटिंग जमत नाही. ग्राहकांमध्ये अशा उत्पादनाबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी शेतकरी व ग्राहक यांच्यात दुवा साधण्याचे काम राज्य सरकारने करावे, अशी मागणी ‘मोर्फा’चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्षा स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे, सुदाम इगंळे, माणिकराव झेंडे,जेजुरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, विश्वस्त शिवराज झगडे, अमरजित जगताप यांनी पवार यांच्याकडे केली आहे.
राज्यातील सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्याचे कृषी, सहकार व पणन मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांचे बरोबर पुढील महिन्यात लवकरच बैठक घेणार आहेत. गोविंदबागेत पवार यांची सेंद्रिय व विषमुक्त शेतीबाबत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राज्यात या शेतीला मोठा वाव आहे.परंतु मार्केटिंग अभावी शेतकरी सेंद्रीय व विषमुक्त शेतीसाठी तयार होत नाहीत. म्हणूनच राज्य सरकारचे धोरण बनावे व सेंद्रिय, विषमुक्त शेती मालाला किफायतशीर मार्केट मिळावे.याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे क्लस्टर राज्य सरकारने बनवून शेतकरी कंपन्यांना लवकरात लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याचे मत ‘मोर्फा’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.