पुणे : व्यक्तीगत मानापमानाचा विचार न करता शरद पवार यांनी पक्षापेक्षा देशाच्या हिताला अधिक प्राधान्य दिले आहे. कृषीमंत्री असताना नव्या हरितक्रांतीसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्षपद पंतप्रधानाना देण्याची सूचना मान्य केली होती. यातच त्यांचे मोठेपण दिसून येते, असे मत माजी केंद्रीय अर्थसचिव विजय केळकर यांनी व्यक्त केले. देशहिताला प्राधान्य देणारे पवार एक ना एक दिवस पंतप्रधान होतील, असेही ते म्हणाले.शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांच्यावरील ‘सुशासन आणि संवाद’ या पुस्तकाचे प्रकासन रविवारी केळकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पवार यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्यासमवेत प्रशासनात आणि खासगी सचिव पदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लेखांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमास महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ उद्योगपती प्रतापराव पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया आणि अध्यक्ष राहुल देशपांडे उपस्थित होते. प्रास्ताविक लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले. सूत्रसंचालन प्रणित कुलकर्णी यांनी केले. (प्रतिनिधी)
शरद पवारांचे देशहितालाच प्राधान्य
By admin | Published: January 25, 2016 12:50 AM