Junnar Vidhan Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सर्वच मतदारसंघांतील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून दोन पक्ष निर्माण झाल्याने मागील निवडणुकीत पक्षाने जिंकलेल्या जागांवर नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असले तरी प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते नेमकी कोणती भूमिका घेणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच सध्या काँग्रेसमध्ये असलेले सत्यशील शेरकर हेदेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कठीण काळात सोबत राहिलेल्या निष्ठावंतांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून आयात उमेदवाराला संधी दिल्यास महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांकडून वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जुन्नरमधूनशरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, शरद लेंडे, अनंतराव चौगुले आणि तुषार थोरात हेदेखील प्रयत्नशील आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करण्याचा प्रयत्न झाल्यास या इच्छुकांपैकी काही जणांकडून बंडाचं हत्यार उपसलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष आयात उमेदवारास संधी देणार असेल तर त्यापेक्षा ही जागा आम्हाला सोडावी, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबतची आपली मागणी मांडली आहे.
इंदापूरचा पॅटर्न जुन्नरमध्येही?
भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार केला होता. आता त्याच पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन इंदापूर विधानसभेची उमेदवारीही अप्रत्यक्षरीत्या जाहीर केल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेते प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे आणि भरतशेठ शाह यांनी बंडाचं निशाण फडकावत ११ ऑक्टोबर रोजी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. याच घटनेची पुनरावृत्ती जुन्नर तालुक्यातही होऊ शकते, अशी चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना साथ देणारे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचीही तुतारी चिन्हावर लढण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो आणि लोकसभा निवडणुकीवेळी पक्षासोबत राहिलेल्या नेत्यांना निष्ठेचे फळ मिळते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.