बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बारामतीतअजित पवार यांच्या सत्तानाट्याच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरबाजीने बारामतीकरांचे लक्ष वेधले. कारण या बॅनरवरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे. हा गायब झालेला फोटो बारामतीच्या बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यानंतर देखील बारामतीत ‘साहेबां’चा फोटो बॅनरवरुन गायब झाल्याचे दिसुन येते. अजिदादांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘दादां’चा फोटो लावत ‘आमचा विठुराया’ संबोधत बॅनर लावले. केवळ बॅनर लावुन कार्यकर्ते थांबले नाहीत. ‘एकच वादा अजितदादा’,‘अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा दिल्या. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर बारामतीचे राजकारण चांगलेच ढवळुन निघाले आहे. बारामतीकरांनी पवार कुटुंबियांचे एकोप्याचे राजकारण सुरुवातीपासून पाहिले आहे. बारामतीच्या इतिहासात प्रथमच या कुटुंबियांचे एकमेकांच्या विरोधी राजकारण पाहण्याची वेळ बारामतीकरांवर आली आहे. बारामतीत शरद पवारांची रणनीती कशी असेल, ज्या बारामतीच्या बळावर त्यांनी देशात ओळख निर्माण केली. त्यांच्यामुळे बारामती देशाच्या राजकारणात ओळखली जाते. त्या बारामतीचे राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार, या विचारानेच बारामतीकर धास्तावले आहेत. बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र रहावेत, अशीच बहुतांश बारामतीकरांची इच्छा आहे.
...भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे अभिनंदन करणारे बॅनर लावले आहेत. भाजपचे पदाधिकारी सचिन साबळे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात हे बॅनर लावले आहेत. शिवाय भाजप बरोबर आल्याने काही भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत अजित पवारांचे स्वागत केले.