अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची 'यंग ब्रिगेड'; पुतण्याविरोधात उतरविले नातवास

By विश्वास मोरे | Published: September 18, 2023 11:45 AM2023-09-18T11:45:13+5:302023-09-18T11:48:52+5:30

मात्तबर विरोधी तरुण असा शहकाटशह देण्याचा संघर्ष राष्ट्रवादीत पहायला मिळणार आहे...

Sharad Pawar's 'Young Brigade' to support Ajit Pawar; Grandfather pitted grandson against nephew | अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची 'यंग ब्रिगेड'; पुतण्याविरोधात उतरविले नातवास

अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांची 'यंग ब्रिगेड'; पुतण्याविरोधात उतरविले नातवास

googlenewsNext

पिंपरी :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांचा गट भाजपबरोबर गेला. त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्येही उमटले. पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी दादांबरोबर गेले, तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच जाण्याचे धाडस यंग ब्रिगेडने दाखविले आहे. तीस वर्षांनी पुतण्याविरोधात आजोबांनी रोहित पवारांच्या रूपाने नातवास पिंपरीच्या राजकारणात उतरविले आहे. बहुचर्चित शहराध्यक्षपदाची धुरा माजी नगरसवेक तुषार कामठे यांच्यावर सोपविली आहे. ‘पॉवर’नीतीची साहेबांची भिस्त यंग ब्रिगेडवर भिस्त असल्याचे दिसून येत आहे. मात्तबर विरोधी तरुण असा शहकाटशह देण्याचा संघर्ष राष्ट्रवादीत पहायला मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ पर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आणि दबदबा होता. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आणि प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गड म्हणूनही लौकिक होता. मात्र, भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचे शिलेदार आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना फोडून पिंपरी-चिंचवड हा महापालिकेचा राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त केला. परिणामी भाजपची एकमुखी सत्ता आली. त्यानंतर राष्ट्रवादी मागे पडली.

भूमिका घेण्यात नेते अयशस्वी, दादांची भूमिका संशयास्पद-

विधानसभा निवडणुकीनंतर २०१९ राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. त्यानंतर अडीच वर्षे सरकार टिकले. मात्र, पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी परिणामकारक भूमिका घेऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपविरोधात भूमिका घेऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपविरोधातील आरोपांची चौकशी केली नाही. चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीतही संदिग्ध भूमिकेमुळे, बंडखोरीमुळे महाविकास आघाडीस अपयशास सामारे जावे लागले. अर्थातच गेल्या अडीच वर्षांत सन २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीमुळे दादांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात होती. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी संशयाचे रूपांतर सत्यात झाले.

गेले ते मनाने की आदरयुक्त भीतीने-

राष्ट्रवादी फुटल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील आजी-माजी आमदार, महापौर, नगरसेवक, स्थायी समिती चेअरमन हे दादांच्या गटांत गेले. गेले ते मनाने की आदरयुक्त भीतीने अशी शहरात चर्चा आहे. साहेबांबरोबर विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह नवीन तरुणांची फळी राहिली. गेले काही महिने साहेब गटाचा शहराध्यक्ष नियुक्त होत नसल्याबाबत विविध कांड्या पिकविल्या जात होत्या. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालून नवीन फळी उभारण्यास सुरुवात केली आहे.

काका-पुतण्या संघर्ष पिंपरीतही -

सन १९९२ मध्ये खासदारकीच्या रूपाने अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात प्रवेश केला. अर्थात शरद पवार यांच्या अनुमतीनेच. साहेबांच्या अनुमतीने पुतण्याला संधी दिली. त्यावेळी दादांनी तरुणांची फळी निर्माण करून आमदार, महापौर अशी पदे मिळवून दिली. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार समर्थक असा संघर्ष झाला होता. वरकरणी संघर्ष दिसत नसला तरी गटबाजीची आग शहरातील नेत्यांमध्ये धुमसत असल्याचे वारंवार दिसून येत होते. असे असतानाही पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर दादांनी वर्चस्व मिळविले. मात्र, दादांनी केलेल्या उपकारांच्या परतफेडीची वेळ आली असता, त्यावेळी ऐन परीक्षेवेळी राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांनी अंग चोरून काम केले. या राजकारणाचा फटका लोकसभा निवडणुकीत दादांच्या पार्थला बसला आणि पुन्हा बारामतीत परतावे लागले.

तीस वर्षांनी काका विरुद्ध पुतण्या-

काकांच्या परवानगीने मध्ये दादांनी राष्ट्रवादी वाढविली. मात्र, अचानक पुतण्याने नवी चूल थाटल्याने शरद पवार यांनी २०२३ मध्ये पुतण्याला शह देण्यासाठी अर्थात शरद पवार यांनी नातवाला पिंपरीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अनुभवायला मिळणार आहे.

नवे आणि दुखावलेले चेहरे-

महापालिकेतील भाजपच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेला एक गट शहरात आहे. त्यांना एकजूट करण्याचे काम रोहित पवार यांनी घेतले आहे. भाजपतील नाराज आणि राष्ट्रवादीत अन्याय झालेल्यांची मोट बांधण्याचे काम पवार यांनी सुरू केले आहे. यातूनच भाजप सोडून सुरूवातीला दादांबरोबर गेलेले माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी साहेबांबरोबर जाण्याची भूमिका घेतली आहे. तर दादा भाजपबरोबर गेल्याने अजित पवार गटाची गोची झाली आहे. भाजपविरोधात बोलण्यास बगल दिली जात आहे. रोहित पवार यांनी यंग ब्रिगेडला घेऊन जाण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे महायुतीविरोधात शरद पवार गट कशी भूमिका घेईल, यावर पवार गटाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Web Title: Sharad Pawar's 'Young Brigade' to support Ajit Pawar; Grandfather pitted grandson against nephew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.