काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्ष एका निष्ठावान व समर्पित नेतृत्त्वास मुकला आहे, अशी शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. रणपिसे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा विचार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला. काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
----------------------------
समर्पित सेनानी हरपला : अशोक चव्हाण
वरिष्ठ काँग्रेस नेते व विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस विचारधारेसाठी समर्पित एक सच्चा सेनानी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य होते. पक्षाने दिलेली जबाबदारी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात त्यांची हातोटी होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
--------------------------
काँग्रेस विचारांवर निष्ठा असणारे नेतृत्व गमावले : बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, पक्षाने काँग्रेस विचारांवर निष्ठा असणारे नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या. अनेक विषयांचा त्यांचा अत्यंत चांगला अभ्यास होता. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात काँग्रेस पक्षाचा विचार जपला आणि तळागाळातील लोकांसाठी कार्य केले.