पुणे : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी... आवडे हे रुप, गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले...पाहता श्रीमुख सुखावले सुख या टाळ-मृदुंगाच्या साथीने सुरेल भजनांनी भारावलेले भक्तिमय रंगाला आलेले उधाण, त्याला सुवासिक मोगऱ्यांच्या फुलांची सुशोभित आकर्षक आरास अशा मंत्रमुग्ध वातावरणात शारदा गजाननाच्या मूर्तीला चंदन उटीचे लेपित श्रीं च्या मूर्तीने उपस्थित भक्तांची लक्ष वेधून घेतले. ही फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाईने हा सोहळा संस्मरणीय ठरला. हे क्षण डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन मंदिरात पुण्यनगरीच्या वासंतिक उटी भजनाची सांगता झाली. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, विश्वास भोर, देविदास बहिरट, माऊली टाकळकर, मधुकर घाडगे, राजेश करळे, तुषार शिंदे, नारायण चांदणे, दादा मोरे, भारतीय वारकरी मंडळाचे संदीप महाराज पळसे, संदीप महाराज सपकाळ, नारायणराव पवार, पांडुरंग अप्पा दातार आदी उपस्थित होते. मंडळाच्या या महाउटीभजनाच्या सांगता परंपरेला यंदा ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वप्नील मोहिते आणि कारागिरांनी फुलांची आरास केली. पुण्यनगरीत सुरु होणाऱ्या वासंतिक उटी भजनाची सांगता ६८ दिवसांनी महात्मा फुले मंडईतील शारदा गजानन मंदिरात होते. अतिशय संस्मरणीय असा हा सोहळा असतो. यानिमित्त मंदिरात मोगरा महोत्सव केला जातो. यंदा मोगरा, जुई, गुलाब आदी फुलांची आरास करण्यात आली होती. १५० किलो मोगरा, २०० किलो जुई, आणि १६ हजार गुलाबाची फुले मोगरा महोत्सवासाठी वापरण्यात आली असल्याचे अण्णा थोरात यांनी सांगितले. सुमारे ७५ वर्षांपूर्वी, पुण्यातील लिंबराज महाराज मठ येथे सुरु झालेला हा उटी भजनाचा सोहळा आजवर अखंडितपणे सुरु आहे. भजनासाठी वारकरी सांप्रदायिक चाली व पारंपरिक सांगितीक चाली वापरतात. भगवान विष्णूंचे आवडते वाद्य पखवाज, तबला व संवादिनी यांची साथ भजनाला असते. सध्या तरुणवर्गाचा सहभाग यामध्ये वाढताना दिसत आहे. या उटी भजनासाठी शहरासोबतच पाषाण, कर्वेनगर, कोथरुड, एरंडवणा, घोरपडी, संगमवाडी, कात्रज, येरवडा आदी भागातून भजनकरी सहभागी होतात.
उटी मोगऱ्याच्या सुगंधात विराजमान शारदा गजानन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 4:50 PM
शारदा गजाननाच्या मूर्तीला चंदन उटीचे लेपित श्रीं च्या मूर्तीने उपस्थित भक्तांची लक्ष वेधून घेतले
ठळक मुद्दे १५० किलो मोगरा, २०० किलो जुई, आणि १६ हजार गुलाबाची फुले मोगरा महोत्सवासाठी वापरमहाउटीभजनाच्या सांगता परंपरेला यंदा ७१ वर्षे पूर्ण