पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ (ट्रस्ट) च्या श्री शारदा गजाननाला रविवारी (दि. २४) २० प्रकारच्या विविध पालेभाज्यांची आरास करण्यात आली. भव्य शारदा गजानन महालात विराजमान झालेल्या श्रींच्या मूर्तीभोवती करण्यात आलेल्या बळीराजाच्या आरासमुळे उत्सव मंडपाचा गाभारा हिरव्या, पांढऱ्या, लाल रंगानी फुलला होता. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दर्जेदार पालेभाज्यांच्या सुमारे दहा हजार गड्ड्यांनी श्रींच्या मूर्तींना सजविण्यात आली होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात दाखल होणाऱ्या मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल मुळा, पांढरा मुळा, अंबाडी, कांदापात, पुदिना, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा आदींमार्फत ही आरास करण्यात आली. कोथिंबीरीच्या ७५ तर अन्य पालेभाज्यांच्या ५० ते ६० गड्ड्यांचा वापर करण्यात आला. मार्केटयार्डातील पालेभाज्यांचे अडतदार राजेंद्र सूर्यवंशी यांच्यावतीने ही आरास करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश घुले, मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, अखिल पुणे फुल बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर यांसह अन्य उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले म्हणाले, बळीराजा वर्षभर शेतकरी मेहनतीने शेतात राबून पालेभाज्या पिकवितो. त्याच पालेभाज्या यंदा गणेशोत्सवात मंदिरात बाप्पा चरणी अर्पण करण्यात आल्या.यावेळी बळीराजा सुखात राहू देत, अशी प्रार्थना करण्यात आली. यापालेभाज्या नंतर गरिबांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर फळांची आरास व पुस्तकांची ही आरास करून पुस्तके व फळे वाटण्यात येणार आहेत.
पालेभाज्यांचा महानैवेद्य पाहण्यासाठी रविवारी सकाळपासून व्यापारी, ग्राहकांनी गर्दी केली तर काहीनी गणरायाचे मनोहारी रूप पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले. यावेळी ओंकार भजनी मंडळातर्फे भजन करण्यात आले.यावेळी ही वारकरी संप्रदायांनी भजनाचा आनंद घेतला.