लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या सर्व जण सोशल माध्यमांमध्ये चांगलेच ॲक्टिव्ह असतात. येणाऱ्या पोस्ट संपूर्ण न वाचता अनेक जण तशाच फॉरवर्ड करतात किंवा त्याला लाईक करत असतात. आपण एखादी पोस्ट फॉरवर्ड करताना त्यात व्यक्त केलेल्या मतामुळे कोणाच्या भावना दुखविल्या जाऊ शकतात. त्यातून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, याचा विचारही करत नाही. राज्यात अशाप्रकारे अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील काही जणांना अटकही झाली आहे.
सोशल माध्यमात शांतता बिघडविणारी किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टला लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड केल्यास जेलची हवा खावी लागू शकते. त्यामुळे कोणतीही पोस्ट लाईक, शेअर, फॉरवर्ड करताना जपून करा.
अनेक जण राष्ट्रपुरुष, राजकीय मान्यवर व्यक्ती यांच्याविषयी पोस्ट करत असतात. त्यात व्यक्त केलेली मते ही त्यांची वैयक्तिक असतात. अनेकदा त्यात चुकीची माहिती असते. काही वेळेला राजकीय व्यक्ती भाषणाच्या ओघात काही टीका करतात. पण, नंतर त्यांनी केलेली टीका ही वस्तुस्थिती असतेच असे नाही. त्यातून अनेकदा जुनी पोस्ट काही जण जाणीवपूर्वक पुन्हा व्हायरल करतात. अशा पोस्टपासून सावध रहा.
तरुणींनो डीपी सांभाळा
अनेक जण आपल्या व्हॉट्सॲपवर आपले फोटो ठेवतात. या फोटोंचा सायबर चोरटे गैरवापर करुन बनावट अकाऊंट तयार करतात. त्याद्वारे ते तुमची बदनामी करु शकतात. अनेक तरुणी अशा सायबर चोरट्यांच्या शिकार झाल्या आहेत. बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे तुमचे नातेवाईक, फ्रेंड यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते.
बनावट फेसबुकवरुन गुन्ह्याच्या ८ महिन्यात ११०७ तक्रारी
गेल्या ८ महिन्यात बनावट फेसबुक अकाऊंट उघडणे, अश्लील मेसेज, बदनामी या प्रकारच्या सुमारे १ हजार १०७ तक्रारी आल्या आहेत. त्यात बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन पैसे मागितल्याच्या दुपटीहून अधिक तक्रारी आहेत. गेल्या वर्षी अशा प्रकारच्या केवळ ७०० तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात आल्या होत्या.
ही काळजी घ्या
* ओळखीच्या मित्रांची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती त्याचीच आहे, याची खात्री करा.
* फेसबुकवर आपले बनावट अकाऊंट नाही ना याची खात्री करा.
* तुमची फ्रेंडलिस्ट स्वत:साठीच उघड ठेवा
* तुमचे फ्रेंड इतरांना दिसू नयेत, यासाठी हू कॅन सी युअर फ्रेंड लिस्टमध्ये ओन्ली मी हा पर्याय निवडा.
* अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठीचा पर्याय बंद करा. केवळ फ्रेंडस् ऑफ फ्रेंडस् हा पर्याय सुरु ठेवा.