पुणे - काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर शशीधरन नायर यांना पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी नायर यांच्या नातेवाईकांबरोबरच शेकडो पुणेकर उपस्थित होते. शशीधरन नायर अमर रहे, भारत माता कि जय, हिंदुस्थान झिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन विजय नायर शहीद झाले. ते पुण्याच्या खडकवासला येथे राहात होते. नौशेरा सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसच्या मदतीने स्फोट घडवून आणला. त्यात नायर यांना वीरमरण आले.
आज सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली. सकाळी 10.45 च्या सुमारास त्यांना वैकुंठात आणण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यावेळी उपस्थित होते. लष्कराच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून नायर यांना मानवंदना दिली. नायर यांचा मावस भाऊ आश्वत नायर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. भावपूर्ण वातावरणात नायर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.