पुणे : पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करी आणि परवानगी दिलेल्या ससूनमधील समितीबाबत या अधिवेशनात चांगलीच चर्चा झाली. साताऱ्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी याप्रकरणी संबंधितांवर मानवी अवयव तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय हाेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षी मे महिन्यात रूबीहाॅल क्लिनिकमध्ये एका महिलेने पंधरा लाख रुपयांच्या बदल्यात किडनी दिली हाेती. मात्र, त्या महिलेला पैसे न मिळाल्याने तिने याची तक्रार पाेलिसांत दिली. पाेलिसांनी याबाबत तपास केला. वैद्यकीय शिक्षण विभाग व आराेग्य विभागही जागा झाला. त्यांनीही याबाबत चाैकशी केली. यामध्ये काही दिवस रूबीमधील किडनी प्रत्यारोपण थांबवले हाेते.
दरम्यान, याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने या किडनी प्रत्याराेपणाला परवानगी देणाऱ्या ससूनमधील विभागीय मान्यता समितीचे अध्यक्ष तथा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अजय तावरे यांना पदावरून दूर केले. हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. अधीक्षकपदाची धुरा सध्या डाॅ. भारती दासवाणी या सांभाळत आहेत.
हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेदरम्यान आमदार शिंदे यांनी या घाेटाळ्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, इथे गरिबांना दाेन दाेन वर्षे वाट पाहूनही किडनी मिळत नाही, तर श्रीमंतांना पैसे देऊन किडनी मिळते हे प्रकरण गंभीर आहे. ससूनच्या सरकारी रुग्णालयातील रॅकेटशी संबंध असलेल्यांवर मानवी अवयवांच्या तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करायला हवी. संबंधितांना केवळ साईड पाेस्टिंग दिली आहे, असाही उल्लेख त्यांनी कुणाचेही नाव न घेता केला. गरिबांना किडनी मिळेल असे सरकारने पाहायला हवे, अशीही मागणी त्यांनी केली.
कारवाई हाेणार का?
आमदार शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून किडनी तस्करी प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणाशी संबंधितांवर काय कारवाई हाेतेय हे पाहणे महत्त्वाचे आहे.