पुणे : अग्निशामक दलाला २०१४-१५ या वर्षात १२० कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे, आपत्कालीन सेवा बजावतानाच महापालिकेला महसूल मिळवून देण्यातही अग्निशामक दलाने मोलाची भूमिका बजावली आहे. अग्निशामक दलाला पहिल्यांदाच १०० कोटींचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी अग्निशामक दल सदैव दक्ष असते. त्याचबरोबर आगीसाररख्या दुर्घटना घडूच नयेत याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारीही दलावर आहे. त्यानुसार नवीन इमारत बांधली जाताना तिथे आगप्रतिबंधक यंत्रणा योग्य पद्धतीने उभारण्यात आली आहे की नाही याची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. त्याकरिता बांधकाम व्यावसायिकांकडून फायर प्रीमियम चार्जेस, फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस घेतले जातात. तसेच हद्दीबाहेरील इमारतींसाठी फायर सेस, हद्दीत आणि हद्दीबाहेर अग्निशामक सेवा फी आणि वार्षिक फी आकारण्यात येते. प्रदर्शने, स्नेहसंमेलने अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या बंदोबस्तासाठी अग्निशामक दलाचे वाहन पुरविण्यासाठी आकारण्यात येणारी भाडे आकारणी, पाणी उपसण्यासाठी पंपाचे भाडे, रुग्णवाहिका आणि प्रेतवाहक वाहनांचे भाडे, विविध कामांसाठी उंच शिडीची वाहने पुरविणे, हद्दीबाहेर आग व इतर आपत्कालीनप्रसंगी सेवा पुरविणे या माध्यमातून हा महसूल जमा करण्यात येतो. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने अग्निशामक दलाला प्रत्येक आर्थिक वर्षात उद्दिष्ट दिले जाते.
अग्निशामक दलाकडून उत्पन्नात शतकोटींचे उड्डाण..!
By admin | Published: April 13, 2015 6:20 AM