पुणे : रंग-रेषेचे जादूगार असलेले शतायुषी चित्रकार आर. व्ही. ऊर्फ बाबा पाठक यांचे दोन दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे कन्या राणी साठे, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दि. १३ जून रोजी पाठक यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.पाठक यांचा जन्म १३ जून १९१५ रोजी तत्कालीन औंध संस्थानचा भाग असणाऱ्या सातारा येथे झाला. पंतप्रतिनिधींसारख्या कलाप्रेमी आणि कदरदान संस्थानिकांमुळे पाठक यांच्यातले कलागुण बहरले. बडोद्याचे ‘कलाभवन’ आणि मुंबईत ‘जे. जे. स्कूल’ मध्ये कलाशिक्षण घेऊन ते कलाक्षेत्रात कार्यरत झाले. स्वातंत्र्यचळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात कला, प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा मेळ घालत ते कोल्ड सिरँमिक्स आणि म्यूरल्सच्या विश्वात प्रसिद्ध झाले. त्यांच्या कलाकृती देशात आणि विदेशात अनेक ठिकाणी विराजमान आहेत. मूळ पिंड चित्रकाराचा असल्याने पाठक यांनी जगात अनेक देशात भ्रमंती करून चित्रे काढली. जलरंग, पेस्टल, तैलरंग अशा माध्यमातून त्यांनी काम केले. अनेक एकल तसेच समूह प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
शतायुषी चित्रकार बाबा पाठक यांचे निधन
By admin | Published: June 21, 2015 12:22 AM