पिंपळवंडी : महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे. या मनमानी कारभारात सुधारणा न झाल्यास महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.परिसरात महावितरण कंपनीने अनेक ग्राहकांना फ्लॅश कंपनीचे मीटर बसविले आहे. हे मीटर प्रमाणापेक्षा जास्त वेगाने पळते. त्यामुळे ग्राहकांना जादा वीजबिल येत आहेत. याबाबत सुमारे एक हजार ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर, या बोगस मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मीटर प्रमाणापेक्षा जास्त पळत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, महावितरण कंपनीकडे नवीन मीटर नसल्याने एक महिन्यापूर्वी पुन्हा तेच नादुरुस्त मीटर बसविले आहेत, एक महिन्याचा कालावधी होऊनही नवीन मीटर बसविण्यात आले नाहीत, वीजबिल कमी करण्यासाठी महावितरण कंपणीचे उंबरठे झिजवावावे लागणार आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते फोन उचलत नाहीत तर पिंपळवंडी येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की, नवीन मीटर उपलब्ध नसल्यामुळे मीटर बसविण्यास उशीर झाला आहे. मीटर आल्यावर ते तत्काळ बसविले जातील. ते कधी उपलब्ध होतील हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.आंदोलनाचा इशारामहावितरण कंपनीने वीजबिलांचे रीडिंग घेण्यासाठी ज्या ठेकेदाराला ठेका दिला आहे, त्या ठेकेदाराकडून व्यवस्थित रीडिंग घेतले जात नसल्यामुळे मनमानी पद्धतीने वीजआकारणी केली जात आहे. वीजबिल कमी करण्यास वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे महावितरण कंपणीच्या मनमानी कारभाराला नागरिक कंटाळले असल्यामुळे आता थेट महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘महावितरण’ कारभाराचा नागरिकांना बसतोय ‘शॉक’
By admin | Published: March 28, 2017 2:20 AM