पुणे : पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याच्या प्रकार केला़ ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली़ चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले़ उमेश कोकरे असे त्याचे नावे आहे. या प्रकरणी बारामती होस्टेल येथील सुरक्षारक्षक गणपत कोकाटे यांनी फिर्याद दिली आहे़ भगवानगड येथे महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी हिंगणे येथील जानकर यांच्या कार्यालयाची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती़या प्रकारानंतर बुधवारी दुपारी बाराच्या सुमाराला राष्ट्रीय समाज पक्षाचे ७ ते ८ कार्यकर्ते बारामती होस्टेलमध्ये शिरू लागले. तेथील सुरक्षारक्षक कोकाटे यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करून ते आत शिरले़ आतल्या बाजूला असलेल्या शरद पवार यांच्या फोटोवर त्यांनी शाई फेकली व ते पळून जाऊ लागले़ तेव्हा तेथील तरुणाने उमेश कोकरे याला पकडले़ ही घटना समजताच जनवाडी पोलीस चौकीतील पोलिसांनी तेथे येऊन काकरे याला ताब्यात घेतले़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही घटना समजताच आमदार अनिल भोसले, माजी नगरसेवक नीलेश निकम, युसूफखान, उदय महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जनवाडी पोलीस चौकीसमोर गर्दी केली़ तेव्हा रासपचे कार्यकर्ते संतोष पाटील हे तेथे उभे राहून फोनाफोनी करीत होते़ त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांच्यात वादावादी झाली़ काही जणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा पोलिसांनी त्यांना बाजूला घेतले़ जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड करताना रासपचे राज्य सचिव बाळासाहेब कोकरे यांच्या आई, पत्नी वमुलाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली़ पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केलेली नाही़ त्याच्या निषेधार्थ आपण हे कृत्य केल्याचे उमेश कोकरे याचे म्हणणे आहे़(प्रतिनिधी)
शरद पवारांच्या फोटोवर शाईफेक
By admin | Published: October 13, 2016 2:07 AM