पुणे : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतात लॉकडाऊन करावा लागला. साधारण ३ महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन वाढल्याने अनेकांचे रोजगार बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. गरिबांच्या मदतीला अनेक संस्था पुढे आल्या. परंतु देहविक्री करणाºया महिलांचे या काळात मोठे हाल झाले. त्यांच्यासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव तारणहार ठरल्या. त्यांनी देहविक्री करणाºया शेकडो महिलांना आतापर्यंत धान्यवाटप केले आहे.
नंदिनी जाधव या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करतात. त्याचबरोबर महिलांच्या जट निर्मूलनाचे मोठे काम त्यांनी हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी देखील जाधव या पुण्यातील बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांना दागिने विणण्याचे प्रशिक्षण देत होत्या. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. त्याचबरोबर आरोग्याचा देखील मोठा प्रश्न होता.सुरुवातीला जाधव यांनी या महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप केले. त्यानंतर अजूनही त्या या महिलांना जेवण तसेच धान्याचे वाटप करत आहेत.
Disclaimer: ‘फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.’
दानशूर लोकांनीही दिला मदतीचा हात
नंदिनी जाधव म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे या महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. या महिलांना माझ्या परीने मदत करण्याचा निर्णय घेतला. माझे काम बघून अनेक संस्थांनी तसेच दानशूर लोकांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या संस्थांना सोबत घेऊन या महिलांना धान्याचे वाटप केले. एचआयव्हीबाधित महिलांना वेळेवर औषध मिळवून दिली.