कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे चाफावस्ती शिवारामध्ये ओढ्यात साफसफाई करताना सोमवारी (दि. १) बिबट्याची तीन पिले निदर्शनास आली होती. ती पिले तरसाची असल्याचे बोलले जात होते. मात्र, ती बिबट्याचीे बछडी असल्याचे सिद्ध झाले आहे. वढू-कोरेगाव परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून शेळ्या, जनावरे, घोडीचे पिलू यांसह शेतमजुरावर हल्ला करणारा प्राणी हा बिबट्याच असल्यावर शिक्कामोर्तब झाले असून वनविभाग या बिबट्यास पकडण्यासाठी पावले उचलतील की नाही, याबाबत ग्रामस्थांंमध्ये अद्याप शंका आहे. श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील चाफावस्ती शिवारामध्ये सोमवारी (दि. १) सकाळी जेसीबीच्या साहाय्याने ओढ्यात साफसफाई करताना जेसीबीचालक राहुल बगदाप यांना बिबट्यासदृश प्राण्याची तीन पिले निदर्शनास आली. त्यानंतर बिबट्याची ती पिले पकडण्यासाठी पुढे गेला असता त्यातील दोन मोठी पिले शेतात पळाली. त्यातील एक लहान पिलू सापडले. त्यानंतर वनकर्मचारी सोनल राठोड व हरगुडे यांना या पिलांबाबत माहिती दिली. वनकर्मचारी राठोड यांनी पिलांची पाहणी केली असता ते पिलू बिबट्याचेच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बिबट्याचे पिलू बिबट्या पकडण्यासाठी असणाऱ्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र दोन दिवसांनंतरही अद्याप त्या पिंजऱ्याजवळ बिबट्या मादी आली नसल्याने ती अधिक हिंस्र होण्याची शक्यता आहे. वनविभागाने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बिबट्याने कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, वढू बुद्रुक, आपटी या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे. वनविभागास अनेक वेळा पिंजरा लावून बिबट्या पकडण्यास सांगूनही पत्रव्यवहार केल्यानंतर चार-पाच दिवसांनी पिंजरा लावण्यापलीकडे कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाहीत. आजपर्यंत बिबट्याने शेळी, घोड्याचे पिलू, कालवड, कुत्र्यांचा फडशा पाडल्याचा प्रकार पाहण्यास मिळत होता. तर गेल्या महिन्यात ७ एप्रिल रोजी भगवान साठे शेतमजूर झोपेत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करीत पायाला तोंडात पकडून ओढत असताना शेतमजूर जखमी झाला असून प्रतिकार केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र तेथून जाताना बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. मात्र नेहमीप्रमाणे वनपाल बी. आर. ओव्हाळ यांनी मात्र बिबट्या का तरस न पाहताच हल्ला करणारा बिबट्या नव्हे तरस असल्याचा जावईशोध लावायला विसरले नाहीत. बिबट्याने परिसरात दहशत निर्माण करीत आता थेट माणसांवरच हल्ला केल्याने बिबट्याने हिंस्र रूप घेतले आहे. त्यात बिबट्या की तरस हा वाद, आता बिबट्याची पिले सापडल्याने संपुष्टात आला असून बिबट्या पकडण्यासाठी वनविभाग ठोस पावले उचलतील की नाही, याबाबत शंका आहे.
वढू येथील ‘ती’ बछडी बिबट्याचीच
By admin | Published: May 03, 2017 2:02 AM