पुणे : परिचारिकेची वेशभूषा करून ससून रूग्णालयातून तीन महिन्याच्या बाळाला पळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता घडली. रिक्षाचालकाच्या मदतीमुळे आरोपी महिलेला अटक करण्यात यश मिळाले आणि बाळ आईला सुखरूपणे मिळाले. बाळाला पाहाताच आईला अश्रू अनावर झाले. दरम्यान, या घटनेमुळे ससून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
वंदना मल्हारी जेठे (वय 24 रा.थिटे वस्ती खराडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तपासासाठी तिला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेशन्यायालयाने दिला आहे. कासेवाडी परिसरात राहाणारी बावीस वर्षीय महिला श्वेता उमेश कांबळे आणि त्यांचे बाळ हे ससून रूग्णालयात उपचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या मोठ्या मुलीची सोनाग्राफी करायची असल्याने आपल्या बाळाला ओळ्खीच्या महिलेकडे दिले आणि ती महिला मुलीबरोबर आत गेली.
मात्र त्या ओळखीच्या महिलेचे पती रूग्णालयात उपचार घेत असल्याने डॉक्टरानी त्या महिलेला बोलावले. त्यावेळी आरोपी महिला त्यांच्या शेजारीपरिचारिकेच्या वेशभूषेत बसली होती. ’माझ्याकडे बाळाला द्या, आई आली की मी बाळाला त्यांच्याकडे देईन असे म्हणून आरोपी महिलेने त्यांना आश्वस्त केले. मात्र जेव्हा बाळाची आई बाहेर आली तेव्हा तिला दोघी महिला आणि बाळ दिसले नाही. ती रूग्णालयाच्या बाहेर गेल्यानंतर तिने सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालकाकडे बाळासंबंधी विचारपूस केली. तेव्हा रिक्षाचालकाने एक महिला बाळ घेऊन जाताना बाहेर पडली असून, माझ्या मित्राच्याच रिक्षेत बसल्याचे रिक्षाचालकाने सांगितले.
रिक्षाचालकाने मित्राला फोन केला आणि त्याला सर्व हकिकत सांगितली. आरोपी महिलेला पकडून रिक्षाचालक आणि बाळाच्या आईने पोलिसांच्या ताब्यात दिले बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी महिलेचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. तिला मूल होत नसल्याने तिने बाळ पळविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक वंदना सपकाळे यांनी सांगितले.