पुणे : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यांसाठी देशात ११७ ठिकाणी तर राज्यात १४ ठिकाणी मतदान करण्यात आले. मंगळवारी मतदानाच्या दिवशी अनेक नागरिकांनी रोजच्या धावपळीतून, विवाह बंधनात अडकण्याआधी वेळ काढत, उन्हाचे चटके सोसत, तब्येतीची पर्वा न करता दोन तीन मजले चढत मतदानाचा हक्क बजावला. पण मतदानासाठी चक्कं '' ती '' दुबईहून आपल्या एक वर्षांच्या तान्हुल्या बाळासह पुण्याला आली. तिने मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. सायली सिताराम तोंडेपाटील - मोरे असे या माहिलेचे नाव आहे. पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी व भाजपाचे गिरीश बापट यांच्यात चुरशीची लढत आहे. मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी परदेशातून भारतात परतण्याचे प्रमाण तसे फार कमी आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. खास मतदानासाठी दुबईहून पुण्यात आलेल्या सायली तोंडे -मोरे म्हणाल्या, माझे वडील एक सामाजिक कार्यकर्ते असल्याने आमच्या कुटुंबात मतदानाविषयी जागृती होती. मला स्वत: ला माझ्या बाबांकडून वारंवार मतदानाचे महत्व समजले आहे. त्यामुळे मतदान करणे हे अत्यावश्यक असल्याचे माझे ठाम मत आहे. त्यामुळेच मी माझ्या १ वर्षांच्या बाळाला घेऊन खास मतदान करण्यासाठी दुबईवरून पुणे गाठले. इथे आल्यावर कोथरुड येथे मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर मला स्वत:ला खूप समाधान वाटत आहे.तसेच राष्ट्रीय कर्तव्य पार पडल्याचा आनंद देखील अनुभवायला मिळाला आहे.
मतदानासाठी '' ती '' एक वर्षाच्या बाळाला घेऊन दुबईवरुन पुण्यात आली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 7:56 PM