पुणे : आमदारकीपेक्षाही त्यांना तिच्या खेळाडूपणाचे आकर्षण होते. आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात ज्या तडफेने जिने लढा दिला ती तडफ त्यांना प्रत्यक्ष पाहायची होती. म्हणूनच तिला उशीर होत असूनही ते तिची वाट पाहात थांबले होते. ती आली, त्यांच्याबरोबर बोलली आणि मग सगळेच खूश झाले. आपल्या त्या लढ्याविषयीही तिने सर्वांना सांगितले व जिंकलेही.
ऑलिम्पिक पदक विजेत्या व आता काँग्रेस पक्षाची हरयाणामधील आमदार झालेल्या विनेश फोगाट यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या वतीने खेळाडूंच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीपटू शांताराम जाधव यांच्यासह शहरातील क्रीडा संस्थांमधील खेळाडूही यावेळी उपस्थित होते. काँग्रेस भवनच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी फोगाट यांचे स्वागत केले.
एकदम साध्या ड्रेसमध्ये आलेल्या फोगाट यांचा बॉयकट, हातामध्ये त्यांनी घातलेला गंडा, शरीरयष्टी सडपातळ पण काटक, कुस्तिगीर असल्याचे त्यांच्या फिटनेसमधून जाणवत होते. भेट म्हणून मिळालेली गदा उंचावून त्यांनी बजरंग बली की जय... अशी घोषणा देताच, उपस्थित खेळाडूंनीही त्यांना तसाच प्रतिसाद दिला. हरयानवी हिंदी भाषेत त्यांनी मुलांबरोबर गप्पाही मारल्या. त्यांच्याबरोबर छायाचित्र काढून घेतली. अन्याय सहन करू नका, असा संदेशही त्यांनी मुलांना दिला. खेळातील सर्व कौशल्य शिकून घ्यावी, सराव करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
फोगाट म्हणाल्या, खेळाडू होण्यासाठी मी कोणाकडून तरी प्रेरणा घेतली. तुम्ही ती माझ्याकडून घ्या. उद्या तुमच्याकडून आणखी कोणीतरी प्रेरणा घेईल. प्रत्येक पिढीत हे असे सुरू राहिले पाहिजे. खेळाडू हा हरतो किंवा जिंकतो. मात्र, तो अखेरपर्यंत लढत असतो. त्यामुळेच खेळणे मला आवडते. माझ्यावर, माझ्या सहकारी महिला खेळाडूंवर अन्याय झाला. मी त्याविरोधातही लढा दिला. सरकारने माझी दखल घेतली गेली नाही. माझा लढा थांबलेला नाही. मी राजकारणात प्रवेश केला. या माध्यमातून मी लढा देत राहीन, असे त्यांनी सांगितले.