...म्हणून त्यांनी गाेळा केली साेनिया गांधी यांची 1 हजाराहून अधिक छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 06:07 PM2018-12-09T18:07:10+5:302018-12-09T18:09:40+5:30
काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांची वर्तमानपत्रात छापून आलेल्या 1 हजार छायाचित्रांचा संग्रह पुण्यातील अनुपमा जाेशी यांनी केला आहे.
पुणे : काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांच्या नेतृत्वाला भाळून त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून पुण्यातील त्यांच्या चाहत्या अनुपमा जाेशी यांनी 2003 सालापासून विविध वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेली साेनिया गांधी यांच्या छायाचित्रांचा संग्रह केला आहे. साेनिया गांधी यांच्या विविध मुद्रांमधील छायाचित्र अनुपमा यांच्याकडे आहेत. त्यांनी या छायाचित्रांचे दाेन वेळेस प्रदर्शन देखील भरविले आहे.
अनुपमा या नाेटरी म्हणून व्यवसाय करतात. त्यांनी काॅंग्रेसच्या शहर सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. 2003 सालापासून त्यांनी साेनिया गांधी यांच्या वर्तमामपत्रांमध्ये छापून आलेल्या छायाचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता त्यांच्याकडे 1 हजाराहून अधिक छायाचित्रे जमा झाली. त्यांनी या छायाचित्रांचे प्रदर्शन देखील दाेनदा भरविले आहे. सध्या त्यांनी ही सर्व छायाचित्रे कार्डशिट्सवर चिकटवून त्यांचे जतन केले आहे. त्याचबराेबर त्यांनी जमा केलेली छायाचित्रे कुठल्या वर्षाची आहेत हेही त्यांनी लिहून ठेवले आहे. गेल्या 15 वर्षांपासून अनेक सभांचे, समारंभाचे साेनिया गांधी यांचे फाेटाे त्यांच्याकडे आहेत. हे सर्व फाेटाे त्यांना साेनिया गांधी यांना दाखविण्याची त्यांची इच्छा आहे. जाेपर्यंत शक्य हाेईल ताेपर्यंत त्यांच्या फाेटाेंचा संग्रह करणार असल्याचे अनुपमा म्हणतात.
अनुमपा म्हणाल्या, मी काॅंग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून काम केले आहे. मला वाटतं साेनिया गांधी ह्या काॅंग्रेस पक्षाचा आत्मा आहेत. महिलांसाठी त्या एक आदर्श आहेत. त्या एक प्रभावशाली महिला आहेत. त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते. मी जेव्हा त्यांच्या छायाचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली त्यानंतर मला माझ्या मित्र - मैत्रिणींनीसुद्धा मदत केली. त्यांनी त्यांच्याकडील साेनिया गांधी यांची छायाचित्रे मला दिली. या छायाचित्रांच 2005 साली पहिलं प्रदर्शन भरविण्यात आलं. या छायाचित्रांचं डिजिटायझेशन करण्याचा माझा विचार आहे. यापुढेही मी त्यांची छायाचित्रे गाेळा करत राहणार आहे.