पुणे: बेटिंगसाठी घेतलेले पैसे परत न केल्याने त्यांनी तरुणाचे अपहरण केले. कुंकवाच्या धन्याला वाचविण्यासाठी त्याच्या पत्नीने गळ्यातील मंगळसुत्र काढून दिले, तरी ती त्याचे प्राण वाचवू शकली नाही. अपहरणकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यु झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघा गुंडावर खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
विशाल अमराळे (वय ३५, रा. बिबवेवाडी) आणि लहु माने (वय ४०, रा. सुखसागरनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर निखील ऊर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय ३२, रा. आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़. याबाबत हर्षदा निखील अनभुले (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे (गु. रजि. नं. ७८०/२२) दिली आहे. ही घटना फ्लाइंग बर्ड स्कुल आंबेगाव ते बिबवेवाडीतील के के मार्केट दरम्यान १५ नोव्हेबर रोजी रात्री साडेदहा ते १६ नोव्हेबर पहाटे पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील अनभुले यांनी विशाल अमराळे याच्याकडून बेटिंगसाठी २८ हजार रुपये घेतले होते. ते परत देण्यासाठी अमराळे याने त्यांना वारंवार फोन करुन धमकाविले होते. आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगून धमक्याही दिल्या होत्या. तरीही निखील याने पैसे परत केले नव्हते. त्यामुळे १५ नोव्हेबर रोजी त्याने निखील याला आंबेगाव येथील फ्लाईग बर्ड स्कुल येथे बोलावून घेतले. तेथून अमराळे व त्याच्या साथीदाराने त्याचे अपहरण करुन त्याला के के मार्केट येथे आणून डांबून ठेवले. त्याला मारहाण केली. त्याने आपल्या पत्नीला फोन करुन आपले अपहरण केल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी पतीच्या मित्राला बोलावून त्याच्याकडे आपले मंगळसुत्र दिले व हे देऊन पतीला सोडवून आणण्यास सांगितले. त्यानुसार हा मित्र मंगळसुत्र घेऊन आंबेगावहून निघाला. दरम्यान, निखील याने गुगल पे वरुन त्यांचे पैसे दिल्यावर त्यांनी निखीलला सोडून दिले. कात्रज चौकातून मित्राच्या गाडीवर बसून मध्यरात्री निखील घरी आला. वाटेत त्याने अमराळे व इतरांनी मारहाण केल्याचे सांगितले. घरी आल्यावर काही वेळाने तो बेशुद्ध पडला. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले. निखील याच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यात मारहाण केल्याने मृत्यु झाल्याचे नमूद केले असल्याने पोलिसांनी या घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर खूनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट अधिक तपास करीत आहेत.