पुणे : ‘ती’ने नोकरी किंवा शिक्षणानिमित्त घरचा उंबरठा ओलांडला खरा; पण पुरुषी वर्चस्व, एकतर्फी प्रेम, लग्नाची आमिषे या सगळ्यांचीच ‘ती’ बळी ठरली. गेल्या काही वर्षांमध्ये महिला अत्याचारांचा आलेख वाढताच राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विवाहितेला क्रूर वागणूक देणे, बलात्कार, विनयभंग आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यात बलात्काराचे १७५, तर विनयभंगाचे २९५ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अपहरणाचे ४०३ गुन्हे नाेंदवण्यात आले आहेत.
महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांना आळा बसावा यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून, कायदे अधिक कठोर केले आहेत. अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार रोखण्यासाठी पोक्सोसारखा कडक कायदा आणण्यात आला. असे असतानाही अत्याचाराच्या घटना काही थांबत नाहीत. लैंगिक अत्याचारासह विनयभंग व पळवून नेण्याच्या घटनादेखील मोठ्या संख्येने समोर येत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांत बलात्काराचे १२८, तर विनयभंगाचे २०० गुन्हे दाखल झाले होते. यंदा या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये अत्याचार करणारी व्यक्ती ही ओळखीतील असल्याचे समोर आले आहे.
अल्पवयीन मुलींना फूस
अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये लैंगिक अत्याचार करून मुलींना गर्भवती करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
सोशल मीडियावरील ओळख पडतेय महागात
मोबाईलचा वापर वाढून सोशल मीडियावर महिला व तरुणींचा वावर वाढला आहे. सोशल मीडियावरून महिला किंवा तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले जाते. त्यातून लैंगिक अत्याचार होतात. तसेच आर्थिक फसवणूक होण्याचेही प्रकार घडत आहेत.
शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हे
गुन्हे जुलै २०२२ जुलै २०२१विवाहितेला क्रूर वागणूक देणे २१९ १६१बलात्कार १७५ १२८विनयभंग २९५ २००अपहरण ४०३ ३४४