- राहुल गायकवाड
पुणे : डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या खुनाने त्यांचं मन हेलावून टाकलं. आपणही दाभाेलकरांच्या अंधश्रद्धा निर्मुलनाच्या चळवळीत काहीतरी याेगदान द्यावे या विचाराने त्यांनी महिलांच्या जटा काढण्याचे कार्य सुरु केले. आणि पाहता पाहता गेल्या चार वर्षात तब्बल 120 महिलांना त्यांनी जट नामक अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त केले. आजच अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी 120 व्या महिलेची जटा काढून एक नवी चळवळ उभी केली आहे.
नंदिनी जाधव यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय हाेता. डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या कार्याबद्दल त्यांना माहिती हाेती. डाॅ. दाभाेलकरांचा खुन झाल्याने त्यांचे मन हेलावून गेले. दाभाेळकरांनी चालवलेली चळवळ आपण आपल्यापरीने पुढे न्यायला हवी असे त्यांनी ठरवले. जाधव यांनी आपला व्यवसाय बाजूला ठेवत महिलांच्या जटा निर्मुलनाचे कार्य हाती घेतले. गेली चार वर्षे महिलांचे समुपदेशन करत त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करुन त्या महिलांच्या जटांचे निर्मुलन करत आहेत. आजपर्यंत त्यांनी 120 महिलांना जटांच्या जखडातून मुक्त केले आहे. यात पुणे जिल्हायातील 116 महिलांचा समावेश आहे. महिलांच्या जटा कापल्यानंतर त्यांच्या मनातील भीती दूर करुन जाधव त्यांचे समुपदेशन करतात. या समुपदेशामुळे महिलांच्या मानसिकतेत माेठा फरक पडला आहे. आज त्यांनी भाेर येथील लक्ष्मी गाेगावले यांच्या डाेक्यावर 30 वर्षापासून असलेली जटा काढून टाकली आहे. त्याचबराेबर पुण्यातील बडगाव बुद्रुक येथील राजश्री पवार यांच्या डाेक्यावर 10 वर्षांपासून असणारी जटा काढली आहे.
जाधव म्हणाल्या, डाॅ. दाभाेलकरांच्या खुनानंतर त्यांचे कार्य पुढे चालविण्याचा निर्णय घेतला. माझा ब्युटी पार्लरचा व्यवसाय बाजूला ठेवून मी गावाेगवीच्या महिलांना जटातून मुक्त केले. स्त्रीच्या बाहेरील साैदर्यांपेक्षा स्त्रीचं अंतरिक साैदर्यं महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. त्यातूनच महिलांना जटमुक्त करायचं मी मनाशी ठरवलं. यात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांची माेठी साथ लाभली. आजच मी भाेर येथील एका 60 वर्षीय महिलेची 30 वर्षांपासून असलेली जटा काढून टाकली आहे. त्याचबराेबर पुण्यातील एका 43 वर्षीय महिलेची 10 वर्षांपासूनची जटा काढली आहे. केस न विंचारल्यामुळे जटा हाेत असते. जटा काढल्यास आपल्या घरच्यांना काहीतरी हाेईल या विचाराने ती तशीच ठेवली जाते. भाेर येथील काढलेल्या महिलेची जटा तब्बल साडेतीन किलाेची हाेती. ती महिला एवढे ओझे गेली 30 वर्षे अंधश्रद्धेतून डाेक्यावर वागवत हाेती. आज तिला त्या ओझ्यातून मुक्त करण्यात आले. जटा काढत असताना समुपदेशन खुप महत्त्वाचे असते. या महिलांशी अनेकदा संपर्क केल्यानंतर त्यांच्या विश्वास जिंकून त्यांच्या मनातील भीती दूर करुन जटा काढण्याचे काम केले जाते. यात अनेकदा महिलांच्या कुटुंबीयांकडून देखील विराेध हाेत असताे. परंतु मी माझे काम सुरुच ठेवते. हे सर्व काम मी एकही रुपया न घेता करते.