पुणे : काश्मिरमधील काही भागात अशांतता आहे. शिक्षित असूनही सरकारी नोकरी हा एकमेव पर्याय असल्याने सरसकट सगळ्यांच्याच हाताला काम मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे बेरोजगारीच अधिक आहे. कामासाठी तरूणांना बाहेरच्या गावचा रस्ता धरणे सहज शक्य आहे. मात्र तरूणींना घरातच अडकून पडावे लागत आहे. तरूणींकडे कला खूप आहेत, पण कलागुणांना व्यासपीठ मिळत नाही. अशा परिस्थितीत तेथील एका तरूणीने हटके मार्ग पत्करला, तो व्यवसायाचा! वर्षभरातच तिच्या व्यवसायाने यशस्वी भरारी घेतल्याने ‘हम भी कुछ कर सकते है’, हा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला. तिच्या यशाकडे पाहून इतर तरूणींच्या आशाही पल्लवित झाल्या असून, ती तरूणींची ‘रोल मॉडेल’ बनली आहे. काश्मिर मधील बांदीपोर गावात राहणारी निदा खान पुण्यात आली असता तिने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. काश्मिरमधील वातावरण.. तिला व्यवसायासाठी मिळालेली प्रेरणा आणि इतरांसाठी बनलेली रोल मॉडेल असा प्रवास तिने कथन केला. एकेकाळी काश्मिरची प्रतिमा जगाच्या पटलावर नंदनवन अशी होती, मात्र काश्मिरचा काही प्रांत दहशतीच्या छायेखाली असल्याने तिथे अशांततेचे वातावरण आहे. बेरोजगारीमुळे अनेक तरूण चुकीच्या मार्गाकडे वळू लागले आहेत. काश्मिरमधल्या तरूणींना शिक्षण झाल्यानंतर काम करणे मुश्किल असल्याने घरातच त्यांचा कोंडमारा होतो आहे. तरूणींमध्ये कला खूप आहेत. पण त्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहून काहीतरी वेगळे करुन दाखविणे हे तरूणींसाठी निश्चितच प्रेरणादायी चित्र आहे. इतर तरूणींसमोर आदर्श निर्माण करणारी निदा खान सांगत होती. ती म्हणाली, लहानपणापासूनच सामाजिक कार्य करण्याची इच्छा होती. बी. एस्सी. करुन एमएससीआयटी केले. मात्र काय काम करू असा प्रश्न पडला. काहीतरी वेगळे करण्याची जिदद खुणावत होती. तेव्हा असीम फाउंडेशनने मदतीचा हात दिला. सफरचंद हे काश्मिरची खासियत. त्यामुळे सफरचंद आणि आक्रोडच्या कुकीज बनविण्याचा बेकरी व्यवसाय सुरू केला. कोशूर क्रंच पासून अॅपल वॉलनट कूकीजची निर्मिती करण्यास सुरूवात केली. सध्या माझ्यासह या बेकरीत ७ महिला काम करीत आहेत. तिने तयार केलेल्या कोशूर क्रंच कुकीजला चेन्नई, बंगळुरू, मुंबई आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तरूणींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी तिने आॅल इंडिया वुमन्स असोसिएशनची स्थापना केली आहे. तांत्रिक क्षेत्रातून व्यवसायाकडे वळणे हे तितके सोपे नव्हते. मात्र आईवडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. तरूणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी एक माध्यम बनले याचा आनंद अधिक आहे.
मी करू शकते तर इतरजणी देखील करू शकतात. फक्त इच्छाशक्ती आणि जिद्द हवी. काश्मिरमधील मुलींना माझ्याकडे पाहून प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणून एक पाऊल पुढे टाकले. - निदा खान , काश्मिरी महिला उद्योजक