पुणे - वयाच्या तिशीत असताना उत्तम नोकरी, मित्र-मैत्रिणींसोबत मजेत सुरू असणारं बॅचलर आयुष्य, ना कसली काळजी, ना चिंता... तसं म्हटलं तर ते प्रत्येकाला हवंच असतं. आयुष्य असं मजेत जात असताना कॅन्सरसारखा आगंतूक पाहुणा आयुष्यात आला तर..? नाही, ही चित्रपट वा सिरीयलमधील ‘रिल’ स्टोरी नाही. अपूर्वा बन्सल हिची ‘रियल’ कहाणी आहे. मात्र, या कथेत तुम्हा-आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असे टिष्ट्वस्ट आहे. कॅ न्सरला घाबरेल, ती अपूर्वा कसली? लहानपणापासून पळणे आवडणाऱ्या अपूर्वाने या जीवघेण्या आजारालाच आयुष्यातून पळवून लावण्याचा निश्चय केला. केमोथेरपी, धावणे आणि तिचा निग्रह यांच्यासमोर कॅन्सरसुद्धा झुकला. अशी ही ३० वर्षीय अपूर्वा आज आपली आवडती नोकरी तर करतेच, शिवाय मॅरेथॉनमध्येही सहभागी होते. येत्या १७ फेब्रुवारीला होणाºया ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये अर्थातच ती धावणार आहे.अपूर्वा ही स्वत:च्या पायावर उभी असलेली मुलगी. मूळ इंदूरची, मात्र नोकरीनिमित्त पुण्यात आलेल्या या मुलीला लहानपणापासून धावायचे वेड होते. खेळ, पळापळी म्हटले, की ती कायम पुढे असायची. पुण्यात आल्यावरही हे वेड कायम राहिले. सेनापती बापट रस्त्यावरून बीएमसीसी महाविद्यालयापर्यंत ती रोज धावायची; पण २०१७मध्ये अचानक शरीरावर उमटलेली एक छोटीशी गाठ तिला कॅन्सरनामक जीवघेण्या राक्षसापर्यंत घेऊन गेली. या आजाराचे निदान झाल्यावर अपूर्वाने पहिल्यांदा स्वत:चं मन घट्ट केलं. कॅ न्सरशी दोन हात करून त्याला हरविण्याचा निर्धार केला. घरच्यांना धीर दिला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले.उपचारांदरम्यान अपूर्वाला एक-दोन नव्हे, तर तब्बल ८ आठ वेळा किमोथेरपी ट्रीटमेंट घ्यावी लागली; पण ती डगमगली नाही. अशा कठीण समयी तिच्यासोबत होतं, ते तिचं धावणं. ‘काहीही होवो, पळायचंच’ या निश्चयापासून ऊन, वारा, पावसासारखी बदलती निसर्गस्थितीही तिला थांबवू शकली नाही. अखेर तिच्या जिद्दीपुढे कॅ न्सरदेखील झुकला. शारीरिक व मानसिक दृढनिश्चयाच्या जोरावर तिने त्याला रिकाम्या हाताने परत पाठवलं.धावणं हा माझा श्वास अन् आत्मविश्वासअगदी लहानपणापासून मी धावतेय. आजारपणात धावणं ही फक्त एक कृती नव्हती, तर माझा श्वास अन् आत्मविश्वास होता. ही एक अशी कृती होती जिने मला आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी आधार मिळाला. सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकानं धावायला हवं किंवा काहीतरी व्यायाम करायला हवा. या काळात मला पुणे रनिंग ग्रुपचे सुधींद्र हरिभट आणि डॉ. मनीषा यांची खूप मदत झाली.
ती धावली आणि कॅन्सरलाही पळवून लावलं ! ३० वर्षीय जिद्दी अपूर्वा बन्सलची जीवनकहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 1:04 AM