पुणे : पुण्यात एक दिव्यांग मूकबधिर जोडप्याला पोलिसांमुळे दिलासा मिळाला आहे. या जोडप्याची सात वर्षांची मुलगी आपल्या आजीला भेटायला गावाला गेली. मात्र लॉकडाऊन झाला आणि ती त्या गावी अडकून पडली. आपल्याला काही करून आईकडे पुन्हा जायचे आहे. असा तिचा आग्रह सुरू झाला. अखेर पोलिसांनी त्या मुलीच्या मामाला पुण्याला येऊन मुलीला सोडण्याची परवानगी दिली. पोलिसांच्या सहकार्यामुळे ती चिमुरडी आपल्या आईच्या कुशीत सुखरूप पोहचली. पुणे शहराच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिह यांच्या देखरेखीखाली डिजिटल पास कक्ष सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी पुण्यातील एका दिव्यांग मूकबधिर जोडप्याची समस्या त्यांना सांगितली. या जोडप्याला सात वर्षांची मुलगी असून ती काही दिवसांपूर्वी आपल्या आजीला भेटायला गेली होती. 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यावर तुला पुण्याला येता येईल. असे त्यांनी मुलीला सांगितले. मात्र मुलीला काही करून आईकडे यायचे होते. यावर त्या मुलीच्या मामाला पोलीस उपआयुक्तांकडून पुण्याला येण्याची व पुन्हा गावाला जाण्याची परवानगी मिळाली. तसेच प्रवासा दरम्यान काही अडचण आल्यास युनिट 2 चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी स्वत:चा मोबाईल नंबर देखील दिला होता. यानंतर ती मुलगी सुखरूप आपल्या आईवडिलाकडे पोहचली. पोलिसांनी संकटकाळी केलेल्या मदतीबद्दल जाधव यांनी पोलिसांचे आभार मानले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण दिवसरात्र काम करत आहात. अशावेळी आपल्याला देखील मुलाबाळांना वेळ देणे शक्य नाही. याप्रसंगी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांना सहकार्य करण्याचे काम पोलिसांनी केले. या शब्दांत त्यांनी पोलीस प्रशासनाला धन्यवाद दिले.
पोलिसांच्या मदतीमुळे 'चिमुरडी' सुखरूप पोहचली आईच्या कुशीत; पुण्यात दिव्यांग जोडप्याला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 8:28 PM
आपल्याला काही करून आईकडे पुन्हा जायचे आहे. असा तिचा आग्रह सुरू झाला.
ठळक मुद्देपुणे शहरात अत्यावश्यक सेवा व महत्वाच्या कारणासाठी डिजिटल पास कक्ष सुरू