दौंड : वेळ सकाळी ११ वाजून १५ मिनिटांची.. सोलापूरहून पुण्याकडे जाणारी रेल्वे मालगाडी दौंड स्थानकात आली... तेथून गाडीला हिरवा सिग्नल मिळताच हातात वॉकीटॉकी घेऊन भारतातील पाचव्या व सोलापूर विभागातील पहिल्या महिला रेल्वे चालकाने इंजिनाचा ताबा घेतला... आणि मालगाडीने पुण्याच्या दिशेने आगेकूच केली... तिचे नाव आहे अनिताराज.अनिताराज ही तरुणी मूळची बिहार येथील आहे. सुरेखा यादव ही महिला भारतातील पहिली रेल्वे चालक झाली. त्यावेळी तिचे दूरदर्र्शनवर बरेच कौतुक झाले. तिच्या मुलाखती मी पाहिल्या आणि मलाही रेल्वे चालक व्हायचयं अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पुरूषांच्या बरोबरीने महिलाही रेल्वेत चालक होवू शकतात. मीही तेच करणार असे मी मनोमन ठरवले. अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथे रेल्वेची परीक्षा दिली. त्यात मी पास झाले. २००६ मध्ये भूसावळ येथे ट्रेनिंग घेतले आणि आज माझे ‘ते’ स्वप्न प्रत्यक्षात उतरले अशी भावूक प्रतिक्रिया अनिताराज हिने ‘लोकमत’शी बोलताना दिली.तिने इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन हा डिप्लोमा केला आहे. रेल्वे स्थानकात अनिताराज हिचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला तिने इंजनाची पूजा केली. या वेळी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अनिताराज दौंड रेल्वे स्थानकातून रेल्वे गाडी नेणार म्हणून तिचे कौतुक पाहण्यासाठी प्रवाशी, नागरिक जमा झाले होते. या वेळी तिच्याबरोबर लोकोनिरीक्षक प्रकाश जगताप, सहायक इंजिनचालक प्रसाद कवळसकर उपस्थित होते. (वार्ताहर)
‘तिने’ घेतला रेल्वे इंजिनचा ताबा!
By admin | Published: February 25, 2015 11:31 PM