बारामती/सांगवी : माळेगाव बु. (ता. बारामती) येथील एका मुलीने छेडछाड प्रकरणातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे तिच्या कुटुंबासह बारामती तालुक्यात गंभीर पडसाद उमटले आहेत. तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे आरोपींनी कृत्य केल्याचे मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादी जबाबात नमूद केले आहे. त्यामुळे मुलीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.माळेगाव येथील अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलीने तरुणांच्या त्रासाला कंटाळून बुधवार (दि. ३०) रोजी जीवन संपवले. याबाबत बारामती तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. येथील शिवनगर इंग्लीश मिडीयममध्ये इयत्ता दहावीत ही मुलगी शिकत होती. तिचे वडील मारुती व्हॅन स्कूल बस चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई वडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. तीला शाळेत येता जाता दोन तरुणांकडून सातत्याने छेडछाडीला सामोरे जावे लागत होते. याबाबत तिने वडिलांना माहिती देखील कळवली होती. तसेच तिच्या वडिलांनी त्या मुलांच्या कुटुंबियांना याबाबत सांगितले होेते. मुलांना समज देण्यासाठी देखील त्यांनी सुनावले होते. मात्र, संबंधितांनी छेडछाड सुरूच ठेवली. त्यामुळे ही घटना घडली. आरोपी गौरव संजय भोसले, वामन सूर्यकांत भोसले यांना गुरुवारी (दि.३१) रोजी पोलिसांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे,अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.दरम्यान, तिच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादी जबाबानुसार त्यांना बुधवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या मुलीने त्यांना फोन केला. यावेळी दोघे आरोपी माझी सतत छेड काढत असतात. त्यापैकी गौरव हा घराजवळ आला आहे. मी बाथरुममध्ये गेले असता त्याने बाथरुमचा दरवाजा जोरात ढकलला. मी असताना त्याने बाथरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती जोरदार ओरडल्यानंतर तो पळुन गेला. त्यांनतर ती घरात आली. ‘‘तो माझी छेड काढत आहे, मी काय करु,’’ अशी तिने वडिलांना विचारणा केली. त्यावर वडिलांनी मी लगेच येतो, तु घाबरू नकोस, असे सांगून धीर देण्याचा प्रयत्न केला. व्हॅनमधील शाळेतील मुलांना तिच्या वडिलांनी बारामती येथे सोडले. तसेच शेजारी राहणाऱ्या विशाल घोडके यांने छेड काढल्यामुळे ती घाबरली आहे, तिला घरी जाऊन बघ, असे फोन करून सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात घोडके यांनी फोन करुन तीला चक्कर आल्याने सरकारी दवाखान्यात घेऊन येत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिचे वडील सरकारी दवाखान्यात गेले. यावेळी घोडके यांनी तीच्या वडीलाना गळफास घेतल्याचे सांगितले.झालेली घटना अत्यंत दु:खद आहे. मुलींनी त्रास होत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचं आहे. याबाबत वारंवार पोलिसांकडून शाळा महाविद्यालयात जाऊन आवाहन करण्यात येत असते. मुलीच्या वडिलांनी माहिती मिळताच आमच्याकडे तक्रार केली असती. तर आज ती आपल्यात असती. - नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी
आरोपींच्या लज्जास्पद वर्तनामुळे तीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 2:08 AM