पुणे : अश्विनी शनिवारी रात्री माझ्याशी बोलली होती. तिने १८ जूनला जबलपूरला येण्याचे तिकीट काढले. वडिलांचा वाढदिवस असल्याने तिला त्यांना सरप्राईज द्यायचे होते. ते आता सरप्राईजच राहिले... देवाने तिला आमच्यापासून हिरावून नेले... असे सांगत कल्याणीनगर येथील अपघातात बळी गेलेल्या अश्विनी कोस्टाच्या आईने हंबरडा फाेडला.
कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या निष्पाप मुलीला का? असा सवालही अश्विनीच्या आईने केला. अश्विनीचे पार्थिव ससून रुग्णालयाच्या शवागारात रुग्णवाहिकेतून आणल्यावर ते पाहताच आईने आक्राेश केला.
कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात कारच्या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर येथील. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली होती. अनिश अवधियाने डी.वाय. पाटील कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. दोघेही जॉन्सन कंट्रोल या कंपनीत काम करीत होते. त्यातून त्यांची मैत्री झाली होती.
हे सारं धक्कादायकच! - अश्विनीचा भाऊ संप्रित म्हणाला की, “आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. कालचे आमचे झालेले बोलणे शेवटचे ठरले. - अनिस अवधियाचा चुलत भाऊ पारस सोनी म्हणाला की, आम्हाला पहाटेच फोन आला आणि धक्काच बसला. अनिशचे आई-वडील वृद्ध आहेत. त्यांची काळजी घेणारे कोणी नाही. त्यामुळे त्यांना आधी माहिती दिली नव्हती.