पुणे : स्वच्छ पुणे सुंदर पुणे अशी पुण्याची टॅगलाईन आहे. पुण्याला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जातात. दिवाळीत माेठ्याप्रमाणावर फटाके नागरिकांनी फाेडल्याने रस्त्यांवर माेठ्याप्रमाणावर कचरा जमा झाला हाेता. पहाटे 3.45 पासून महापालिकेच्या सफाई महिला कामगार निलाबाई खवले या रस्त्याची सफाई करत हाेत्या. यावेळी तेथे माॅर्निंग वाॅकला आलेल्या पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर माेळक यांनी त्यांना भल्यापहाटे मनापासून रस्ता स्वच्छ करताना पाहिले. ते पाहिल्यानंतर त्यांनी त्या कर्मचारी महिलेची विचारपूर करत त्यांच्या कामाबद्दलच्या निष्ठेला सलाम केला.
या पूर्वी देखील माेळक यांनी सेल्फी विथ सफाई कामगार ही माेहिम सुरु केली हाेती. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर तसेच कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईची माेहिम हाती घेतली हाेती. दिवाळीचा शेवटचा दिवस असल्याने शहरात नागरिकांनी माेठ्याप्रमाणावर आताषबाजी केली. त्यामुळे रस्त्यांवर माेठा कचरा साठला हाेता. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी राेज पहाटे शहरातील सर्वच रस्त्यांची सफाई करत असतात. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास माेळक हे हडपसर भागात माॅर्निंग वाॅकला निघाले हाेते. तेव्हा त्यांना एक महिला स्वच्छता कर्मचारी मनापासून रस्ता झाडत असल्याचे दिसले. त्यांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्या गेली 19 वर्षे स्वच्छतेचे काम करत असल्याचे त्यांना कळाले. त्यांच्या कामाचे काैतुक करत त्यांनी त्यांना सलाम केला. तसेच त्यांच्यासाेबत आवर्जुन एक सेल्फीसुद्धा घेतला. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना साथ देऊन पुण्याला क्रमांक एकचे स्वच्छ शहर करण्याचे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले.