पुणे - प्रेम प्रकरणातून नुकतेच रायगडाच्या पायथ्याशी झालेलं दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असताना पुण्याच्या सदाशिव पेठेत तशीच धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग सुरू केला होता. तरुणापासून आपली जीव वाचवण्यासाठी ती तरुणी वाचवा... वाचवा... असा आक्रोश करुन भररस्त्यात धावत होती. रस्त्यावरील लोक हे पाहात होते, पण कोयता पाहून कोणीही पुढे यायचं धाडस करत नव्हतं. अखेर, मी पुढे येऊन वरच्यावर कोयता रोखला, आणि तरुणीचा जीव वाचला, असा सिनेस्टाईल थरार यशपाल जवळगे या तरुणाने सांगितला.
पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी दहा वाजण्याच्या पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला. प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तरुणी जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेचा थरार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिनेस्टाईल थरारक घटनेत जखमी तरुणीसाठी दोन तरुणांनी जीवाची बाजी लावली. त्यामुळे, तरुणीचा जीव वाचला.
मुलगी धाव होती, मला वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती. मुलगा तिच्यामागे कोयता घेऊन पळत होता. पण, कुणीही तिच्या मदतीला जात नव्हतं, कोयता बघून सगळेच घाबरत होते. त्याचवेळी, मुलगी माझ्याजवळून पळून जात होती, मीही लगेच तिच्याकडे धावत सुटलो, तो तरुण तिच्या अंगावर कोयता मारणार, तितक्या मी वरच्यावरच तो कोयता पकडला. त्यानंतर, एक मित्र माझ्या मदतीला आला आणि आम्ही दोघांनी त्याला धरुन ठेवलं. सुदैवाने तरुणीचा जीव वाचला, असा थरारक प्रसंग यशपाल जवळगे या तरुणाने सांगितला. तसेच, दर्शना पवार ताईचा घाव अजून मिटला नाही, तोपर्यंत हा असला विकृत प्रयत्न घडतोय. पण, समाज डोळे मिटून बघतोय, अशी खंतही या तरुणाने बोलून दाखवली. तरुणीला वाचवताना या युवकालाही कोयत्याचा किरकोळ घाव बसला आहे. दरम्यान, या घटनेनंतर तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिला. आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या तरुणांचं सुप्रिया सुळे यांनी कौतुक केलंय, तरुणांनी जीवाची बाजी लावून मुलीचे प्राण वाचवल्याचं सांगत गृहमंत्र्यांनीही पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केलीय.
महिला आयोगाने घेतली दखल
संबंधित घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेवर रूग्णालयात उपचार सुरू असून सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात येईल. पुणेपोलिस आयुक्त वैयक्तिक तपासात लक्ष देत असून, घटनेचा सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना आयोगाच्या वतीने दिल्या आहेत. आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहोत. असे रुपाली चाकणकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.