पुणे : घरात झालेल्या भांडणातून तिने डोक्यात राग घालून घेतला. आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर ती घरातून बाहेर पडली. घरातील लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली. तिचे मोबाईल लोकेशन घेतले तर ती आसामामध्ये असल्याचे आढळून आले. ३० वर्षांची महिला सोबत लहान मुलगा तसेच देशाच्या सीमेवरच्या जिल्ह्यात आढळल्याने लॉकडाऊनमध्ये ही महिला इतके लांब गेलीच कशी असा प्रश्न पोलिसांना पडला. सामाजिक सुरक्षा विभागाने तातडीने एक पथक आसामाला पाठविले. करीमगंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या महिलेला ताब्यात घेऊन पुण्यात आणले. तेव्हा तिने सांगितलेले कारण ऐकून पोलीसही हैराण झाले.
वारजे येथील ही ३० वर्षांची महिला पुण्यातच राहणारी. ती नोकरी करते. तिचा पतीही नोकरी करतो. घरात भांडण झाले. घरातील कोणी आपले ऐकत नाही़ हे पाहून ही महिला आपल्या ३ वर्षाच्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली. वारजे पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार ८ जून रोजी दाखल करण्यात आली होती. सामाजिक सुरक्षा विभागाने या महिलेचा शोध सुरु केला. तेव्हा तिच्या मोबाईलचे लोकेशन आसाममधील करीमगंज सिलचर रोड येथे आढळून आले. पुणे पोलिसांनी तातडीने करीमगंज पोलिसांना याची माहिती कळविली. तेथील पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन मुलासह तिला १४ जूनला ताब्यात घेतले. ती म्हणाली, भांडणामुळे राग आल्याने मी बाहेर पडले होते. राग शांत झाल्यावर घरी परत येणारच होते.ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस शिपाई भांडवलकर हे तातडीने आसामला गेले. त्यांनी या महिलेला मुलासह ताब्यात घेऊन पुण्यात आणले व नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत पुण्याहून चारचाकीने इतक्या लांब ही महिला गेलीच कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तिला वाटेत कोणीही अडविले नाही का?. तिच्याबरोबर आलेली व्यक्ती कोठे गेली़ असे अनेक प्रश्न निर्माण झाले. तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याने याबाबत चौकशी करता आली नाही. इतक्या लांब गेल्यानंतरही तिला सुखरुप परत घरी आणता आले, हे अधिक महत्वाचे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी चांदगुडे यांनी सांगितले.