(महेश जगताप)
सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 'काटे की टक्कर' दिली होती. मात्र, या निवडणुकीत सतीश काकडे यांनी आपली तलवार 'म्यान' केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे दिलीप खैरे यांनी या निवडणुकीत आपले दंड थोपटले असून सर्वच जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ४७५ उमेदवारी अर्ज, भाजपच्या वतीने ३५ उमेदवारी अर्ज तर शेतकरी कृती समितीच्या वतीने ५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २० जागांसाठी तब्बल ५६५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडून सर्वात अधिक लोकांनी उमेदवारी मागितल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डोकेदुखी ठरणार आहे. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वरनगर येथे मेळाव्यात बोलताना जुन्या नव्या चेहेऱ्यांना संधी देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मदत मदतीचा शब्द देणारे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे हे या मेळाव्याला अनुपस्थितीत राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, सतीश काकडे यांचे बंधू राहुल काकडे, मुलगा अभिजित काकडे व कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे हे या मेळाव्याला उपस्थित होते. त्यामुळे या निवडणुकीत शेतकरी कृती समिती पॅनेल उभे करणार की राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व भाजपने संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील सभासदांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र कृती समितीने अद्याप कोणतेही पाऊल उचलले दिसत नाही.
राष्ट्रवादीने सोमेश्वर विकास पॅनेलच्या माध्यमातून गुरुवार (दि. २३) पासून गावनिहाय सभासद संपर्क दौरा सुरू केला आहे. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह पश्चिम भागातील प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. सोमेश्वर कारखान्याने मागील पाच वर्षांत केलेल्या सुधारणा, संपूर्ण कर्जमुक्ती, राज्यात दिलेला उच्चांकी दर, शिक्षण संस्थेची होत असलेली प्रगती, सुरू असलेले विस्तारीकरण, कामगारांना दिलेली पगारवाढ, जिरायती भागातील रस्ते आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करत असलेल्या उपाययोजना, उसाचे अधिकचे उत्पादन वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, कारखान्याने केलेला प्रगतीचा आढावा सभासदांपुढे मांडला जात आहे.
दुसरीकडे भाजपने सोमेश्वर परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सर्वपक्षीय मोट बांधत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. पुणे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांच्यासह स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क दौरे सुरु केले असून, कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सभासदांनी यावर विचार करण्याचे आवाहन केले जात आहे.
चौकट
सतीश काकडे यांची भूमिका अजून गुलदस्त्यात...
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कडवी झुंज देणारे सतीश काकडेंची भूमिका या निवडणुकीत नरमाईची आहे. अजित पवार यांच्या मेळाव्याला अनुपस्थितीत राहणे आणि शेतकरी कृती समितीच्या वतीने ५५ उमेदवारी अर्ज दाखल होणे. यातून वेगळे संकेत सभासदांना मिळत आहेत.